Rajya Sabha Vacancy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajya Sabha Vacancy : राज्यसभा जागेवरून राष्ट्रवादी पेचात; भुजबळ, मुंडे, आदिकांसह नवनीत राणांच्याही नावाची चर्चा!

Rajya Sabha seat vacated Sunetra Pawar? Chhagan Bhujbal, Dhananjay Munde, Avinash Adik and Navneet Rana emerge as key contenders amid intense political lobbying : अजित पवार राष्ट्रवादीचा दावा असलेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता असतानाच, वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू आहे.

Sampat Devgire

Ajit Pawar NCP Politics : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची नियुक्ती होणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ही जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कोट्यातील असल्याने पक्षापुढे अनेक राजकीय पर्याय उभे ठाकले आहेत. त्यामुळे आगामी नियुक्ती केवळ एका खासदाराची निवड न राहता पक्षातील सत्तासमीकरणे आणि भविष्यातील राजकीय रणनीती ठरवणारी ठरू शकते.

मुंबईत आज होणाऱ्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा मुद्दा प्रमुख असला, तरी राज्यसभेच्या रिक्त जागेबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर विविध नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव राज्यसभेसाठी सर्वाधिक चर्चेत आहे. भाजपमधील एका प्रभावी गटाकडून भुजबळ यांच्या नावाला पाठबळ दिले जात असल्याची चर्चा आहे. भुजबळ यांना दिल्लीच्या राजकारणात सक्रिय भूमिका देण्यामागे महायुतीचे व्यापक राजकीय गणित असल्याचे मानले जात आहे.

भुजबळ राज्यसभेत गेल्यास राष्ट्रवादीच्या (Ajit Pawar NCP) कोट्यातील एक मंत्रीपद रिक्त होणार आहे. त्या जागेसाठी माजी खासदार समीर भुजबळ यांचे नाव पुढे येत असून, भुजबळ कुटुंबाकडून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दरम्यान, माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील रिक्त होऊ शकणाऱ्या मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यसभा आणि मंत्रीपद या दोन्ही स्तरांवर राष्ट्रवादीत नवे सत्तासमीकरण तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे पक्ष नेतृत्वासमोर संतुलन साधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

राज्यसभेसाठी पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांचे नावही चर्चेत आहे. पक्षाचा राष्ट्रीय विस्तार आणि दिल्लीतील संघटनात्मक उपस्थिती मजबूत करण्यासाठी आदिक यांना संधी देण्याचा विचार काही नेत्यांकडून पुढे केला जात असल्याचे समजते. राष्ट्रवादीला राष्ट्रीय पातळीवर अधिक प्रभावी बनवण्याच्या दृष्टीने हा पर्याय महत्त्वाचा मानला जात आहे.

नवनीत राणा यांच्या भेटींनी वाढल्या चर्चा

भुजबळ, मुंडे आणि आदिक यांच्या नावांची चर्चा सुरू असतानाच भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवार यांची सलग दुसऱ्यांदा भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही जागा भाजपच्या पसंतीच्या उमेदवाराकडे जाऊ शकते का, याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सुनेत्रा अन् पार्थ पवार यांची भूमिका निर्णायक

या संपूर्ण प्रक्रियेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या काही दिवसांत विविध पक्षांतील काही नेत्यांनीही पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले जात असून, राज्यसभेसाठी पडद्यामागे जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भुजबळ यांना दिल्लीत पाठवायचे, मुंडेंना पक्षात मोठी भूमिका द्यायची, की राष्ट्रीय विस्ताराच्या दृष्टीने नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवायचा, असा पेच राष्ट्रवादी नेतृत्वासमोर उभा राहिला आहे.

केंद्रातील मंत्रिपदाचेही गणित

विशेष म्हणजे, पंकज भुजबळ यांची यापूर्वीच विधान परिषदेवर नियुक्ती झाली आहे. अशा परिस्थितीत छगन भुजबळ राज्यसभेत गेल्यास केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदासाठी त्यांचा विचार होऊ शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे, राज्यातील रिक्त होणाऱ्या मंत्रीपदावर समीर भुजबळ दावा सांगत असल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत समीकरणे आणखी गुंतागुंतीची बनली आहेत. राज्यसभेच्या या एका जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेली हालचाल आता महायुतीच्या व्यापक राजकारणावरही परिणाम करू शकते. त्यामुळे अखेर अजित पवार गट कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करतो, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT