Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News: नाशिक जिल्हा बँकेवर प्रशासक तरीही भुजबळ म्हणतात निवडणूक नको; थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र : काय आहे कारण?

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी पत्रात काय म्हटलं?

सरकारनामा ब्यूरो

Nashik District Bank: नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुस्थितीत येईपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये. तोपर्यंत बँकेवर प्रशासक ठेवण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

नाशिक जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर असेल त्या टप्प्यावर ३० जून २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे आदेश शासनाच्या सहकार विभागाने २३ मे २०२३ रोजी काढले. त्यामुळे आता जुलै २०२३ नंतर निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी जिल्हा बँकेची परिस्थिती पूर्व पदावर येत नाही, तो पर्यंत निवडणुका घेऊ नये, अशी मागणी केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सहकार मंत्र्यांना पत्र दिले आहे.

छगन भुजबळ यांनी पत्रात काय म्हटलं?

"सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या आदेशानुसार, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया ३० जून २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ३० जून २०२३ नंतर या बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरु होईल. मात्र, बँकेची आर्थिक स्थिती पाहता निवडणूक लावणे हे अहिताचे ठरणारे आहे".

"२०१७ ते मार्च २०२१ पर्यंत सदर बँक रिझर्व्ह बँकेद्वारा विहित केलेली ९ टक्के भांडवल पर्याप्ता (CRAR) राखू शकलेली नाही. त्यामुळे बँकिंग नियमन अधिनियम १९४९ चे कलम ११ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याने या बँकेवर प्रशासक आहे. पण बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नसतांना बँकेची निवडणूक लावली तर या सहकारी बँकेची वाट लागेल", असं भुजबळ यांनी पत्रात म्हटलं आहे.

"या बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणं, अनुप्तादित कर्जाची वसुली करणं, बँकेची भांडवल पर्याप्तता वृद्धिंगत करणं तसेच थकबाकीचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासक मंडळाकडून चांगल्या उपाययोजना केल्या जात आहेत.

त्यामुळे बँक हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासकांकडून सकारात्मक कार्यवाही केली जात आहे. पण त्यासाठी प्रशासकांना पुरेशा कालावधी मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे काही दिवस प्रशासकांना ठेवले तर ही बँक आर्थिक सुस्थितीत येईल", असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, "या वस्तुस्थितीचा आणि बँकेबरोबरच बँकेच्या सभासद आणि शेतकऱ्यांचा विचार न करता बँकेची निवडणूक लावणं हे अतिशय अविचारी ठरणारं आहे. त्यामुळे बँकिंग नियमन अधियन १९४१ चे कलम ११ मधून ही बँक बाहेर येईपर्यंत, नाशिक जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरु करू नये", अशी मागणी भुजबळांनी केली आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT