Political News: आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच जोरदार तयारीला लागले आहेत. राज्यात सध्या आघाडी आणि युतीचं राजकारण पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात युती आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची महाविकास आघाडी आहे.
यातच ठाकरे गटाला वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिलेला आहे. राज्याच्या राजकारणात शिवसंग्राम, रासप, स्वाभीमानी, मनसे, रयतक्रांती, आरपीआय यांच्यासह अजून काही पक्ष राज्यात आपले अस्तित्व दाखवून आहेत. मात्र, आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील 'बीआरएस' पक्षानेही महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे.
तसेच आम आदमी पार्टीनेही आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवलेला आहे. यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एका पक्षाची एन्ट्री झाली आहे. 'स्वराज्य संघटने'च्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे यांनी 2024 ची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. "तयारीला लागा, आपण निवडणुका लढवू", अशा सूचनाच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. आगामी निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी राजकीय पक्ष कसोशीने प्रयत्न करतील यात शंका नाही.
आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आता आणखी चुरस वाढणार आहे. कारण 'आप'ने महाराष्ट्रात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी लक्ष केंद्रित केलं आहे. या पार्श्वभूमीवरच आम आदमी पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी 'स्वराज्य यात्रा' काढण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे के.चंद्रशेखर राव यांच्या 'बीआरएस' पक्षात महाराष्ट्रातील काही माजी आमदारांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे 'बीआरएस'ला बळ मिळालं आहे.
आता आगामी निवडणुकीत 'स्वराज्य संघटने'च्या माध्यमातून निवडणुका लढवण्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप आणि आघाडीचं टेन्शन वाढणार आहे. नव्या पक्षाच्या एन्ट्रीने आगामी निवडणुका लक्षवेधी ठरणार यात शंका नाही.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.