Rashid Shaikh, Malegaon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`एमआयएम`चे मौलाना मुफ्ती हे मालेगावच्या इतिहासातील सर्वात निष्क्रीय आमदार!

निष्क्रीय पोलिस असल्यावर मालेगाव शहराचे काय होणार? असा प्रश्न केला.

Sampat Devgire

मालेगाव : शहराच्या (Malegaon) इतिहासातील आजवरचा सर्वात निष्क्रीय आमदार म्हणून विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल (Maulana mufti) यांचा उल्लेख करावा लागेल. राज्यातील आमदारांना दरवर्षी मिळणारा ४ कोटी आमदार निधी देखील ते खर्च करू शकले नाहीत हे शहराचे दुर्दैव आहे. त्यांनी यातील फक्त ९२ लाख रुपये खर्च केले. उर्वरित ३ कोटी ८ लाख रुपये निधी वाया गेला. ही बाब त्यांच्या निष्क्रियतेवर शिक्कामोर्तब करते, असा आरोप माजी आमदार रशीद शेख (Rashid Shaikh) यांनी केला आहे. (Rashid Shaikh said Maulana Mufti not able to spend even MLA fund)

ते म्हणाले, जी बाब आमदारांची तीच बाब पोलिसांची आहे. मालेगाव शहरात रोजच लहान- मोठी, चोरी, रस्तालुट, घरफोडी होत आहे. आता तर थेट पोलिसांवरच गोळीबार झाल्याने, शहर पोलिसांच्या हाताबाहेर चालले आहे, असा आरोप माजी आमदार रशीद शेख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

श्री. शेख म्हणाले, की पोलिसांनी गुन्हेगारांना जणू काही मोकळे रान दिले आहे. निरपराधांना मात्र नाहक त्रास दिला जात आहे. पूर्व भागातील अजीज मास्टर यांच्या घरी रविवारी मध्यरात्री अचानक काही कारण नसताना चौकशीच्या नावाने पोलिसांनी छापा टाकला. महिला घरात असताना महिला पोलिसांच्या मदतीविना मध्यरात्री घराची झडती घेतली. यामागे त्यांना धमकावण्याचा प्रयत्न होता.

शहरातील पोलिसांची निष्क्रीयता व या प्रकरणा संदर्भात आपण मंगळवारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत त्यांना या मागणीचे निवेदन सादर करणार आहोत. आमदार मौलाना मुफ्ती यांना शहरातील प्रश्‍न सोडविण्यासाठी वेळ नाही. यंत्रमागधारकांच्या असंख्य समस्या आहेत. यंत्रमागाचे वीज अनुदान बंद झाले. त्यावर ते सभागृहात काहीच बोलले नाहीत. अधिवेशनात त्यांनी उड्डाणपूल काम विलंबाबद्दल प्रश्‍न विचारला आहे. मुळात या पुलाचे काम त्यांच्या समर्थकांमुळेच लांबले हे संपुर्ण शहराला ठाऊक आहे. कत्तलखान्या संदर्भातही त्यांनी प्रश्‍न विचारला आहे. कामाच्या बाबतीत आमदारांची परिस्थिती ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी आहे. याउलट महापालिका निधी, नगरसेवक निधीतून होत असलेल्या विकासकामांची आम्ही रोज उद्‌घाटने करीत आहोत.

शहरातील नवीन तीन छोटेखानी पुलांच्या कामांचा आम्ही रविवारी शुभारंभ केला. शहरात साधारणत: ३० ते ४० कोटी खर्चातून रस्ते, गटारी, सिमेंट कॉंक्रीट रस्ते, कुंपन अशी असंख्य कामे सुरु आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच शहराचा विकास करु शकेल, असे ते म्हणाले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते माजी नगरसेवक शकील जानी बेग आदी उपस्थित होते.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT