Maharashtra Politics :अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला वेग आला आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील सर्वच महत्त्वाच्या नेत्यांनी येत्या 12 तारखेला दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणावर निर्णय घेतला जाणार होता असा दावा केला आहे. अजित पवार यांच्यासोबत यासंदर्भात बैठक झाली होती असे सांगत बैठकीचा एक व्हीडीओ देखील सादर करण्यात आला आहे.
दरम्यान अशातच आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले आहे. विलीनीकरणाबाबत जे काही करायचे आहे ते करताना त्याबाबत आम्हाला भाजपला विचारावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही बाब घालूनच पुढील निर्णय घ्यावा लागेल असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
दोन्ही ठाकरे बंधू जसे एकत्र आले तसे पवार एकत्र यावे असं वाटत आहे. परंतु ठाकरे बंधू व पवार यात फरक आहे. कारण आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे जे काही करायचे ते आम्हाला बीजेपी सोबत राहून करायचे आहे. त्यामुळे कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही घ्यायचे यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलावे लागेल. विलीनीकरणाबाबतचा कोणताही निर्णय हा नव्या नेतृत्वाखाली सामुदायिकपणेच घेतला जाईल, अशी स्पष्ट भूमिका भुजबळांनी मांडली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेनिमित्त येवला येथे पत्रकारकारांशी संवाद साधताना भुजबळांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. भुजबळ म्हणाले, मला एकट्याला काय वाटतं याला काहीच महत्त्व नाही. भाजप सत्तेत असल्याने त्यांना विश्वासात घेणे अपरिहार्य आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत बोलणे झाले असेल, तर काय बोलणे झाले, हे माझ्यासह कोणालाही माहिती नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले की माझ्याशी कधीही अजित पवार त्याबाबत कधीही बोलले नाहीत.
भुजबळ पुढे म्हणाले, जर सरकारमधून बाहेर पडून ‘एनडीए’सोबत जाण्याचा विचार असेल, तर ती गोष्ट वेगळी ठरेल. मात्र असा विचार दादांनी केला असेल, असे मला तरी वाटत नाही. सध्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या असून त्यांचेच नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच सर्व चर्चा होतील. आजच किंवा उद्याच निर्णय व्हायलाच हवा, असे काही नाही. राजकारणात गोष्टी कधी घडतात, कधी नाही, असेही त्यांनी नमूद केले.
शपथविधी सुनेत्रा पवार यांना विचारूनच
दरम्या शपथविधी बाबत बोलताना भुजबळ म्हणाले, तो निर्णय सुनेत्रा पवार यांना विचारूनच घेण्यात आला. दुसरे कोणतेही नाव समोर नव्हते. मात्र उगाचच या निर्णयावर अनावश्यक गोंधळ उडवण्यात आला. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या माहितीतून हा निर्णय झालेला असतानाही एवढा गदारोळ का, असा प्रश्न भुजबळांनी उपस्थितीत केला. उलट शपथविधी लांबला असता तर राज्यात अधिक अफवा आणि संभ्रम निर्माण झाला असता. शपथविधीमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे भुजबळ म्हणाले.
भुजबळांच्या विधानाचा अर्थ काय?
दरम्यान, विलीनीकरणाचा कोणताही निर्णय भाजपला विश्वासात घेऊनच घ्यावा लागेल, या छगन भुजबळांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भुजबळांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाचा निर्णय खरोखरच भाजपच्या हातात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय झाला, तरी तो भाजपच्या अटींवर, सत्तेत राहून आणि मर्यादित स्वरूपातच होणार का, की हे विलीनीकरण होऊच दिले जाणार नाही, यावरही चर्चांना उधाण आले आहे. भुजबळांच्या एका विधानामुळे राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबत आणि सत्तेतील समीकरणांबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.