नंदुरबार :राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना मंत्री अदिती तटकरे यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विलीनीकरणाबाबतचा अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील. आपण पक्षातील एक छोटी कार्यकर्ता असून, या विषयावर अधिक भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना या प्रकरणात विनाकारण खलनायक ठरवले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
नंदुरबार येथे बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेते एकत्रितपणे याबाबत योग्य तो निर्णय घेतील. सध्या आपण सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. त्या जी भूमिका घेतील, ती पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी आपल्याला कोणतेही निमंत्रण आले नव्हते, असेही अदिती तटकरे यांनी सांगितले. विलीनीकरणासंदर्भात होणाऱ्या बैठकीबाबतही आपल्याला कोणताही फोन आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या चर्चांमध्ये सुनील तटकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. विलीनीकरणाच्या विषयावर सुनील तटकरे यांना विनाकारण खलनायक का ठरवले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गेल्या अनेक वर्षांपासून आपण सुनील तटकरे आणि अजित पवार यांना एकत्रितपणे काम करताना पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्यावर होणारी टीका दुर्दैवी असल्याचे त्या म्हणाल्या.
विलीनीकरणाचा निर्णय हा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर होणारा विषय आहे. त्यामुळे या प्रक्रियेबाबत सुरू असलेल्या टीकेकडे फारसे लक्ष न देता, चांगल्या उद्देशाने आपले काम सुरू ठेवणे महत्त्वाचे असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुरू असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून पक्षाच्या आमदारांना तातडीने फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घडामोडींमुळे नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या मंत्री अदिती तटकरे यांनी आपला नियोजित दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी पार्थ पवार यांनीही पुण्यात पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अदिती तटकरे या नियोजित कार्यक्रमानुसार रात्री खान्देश एक्स्प्रेसने मुंबईला परतणार होत्या. मात्र, मुंबईतून आलेल्या फोननंतर त्यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्या आता दुपारी चार वाजता जळगावमार्गे मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांशी संपर्क साधला जात असल्याचे समजते. नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा करण्यासाठी हे फोन करण्यात आले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, पक्षातील या तातडीच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
दुसरीकडे, पार्थ पवार यांनीही पुण्यात पक्षाच्या महत्त्वाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा होणार, तसेच पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत काही निर्णय घेतला जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आमदारांना तातडीने संपर्क, पुण्यातील बैठक आणि अदिती तटकरे यांचा दौरा बदलण्याच्या घडामोडी एकाचवेळी समोर आल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. मात्र, या घडामोडींचा विलीनीकरणाच्या निर्णयाशी थेट संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.