Shivsena leader Anil Kadam & NCP MLA Dilip Bankar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

निफाडला राष्ट्रवादीचे तीघे जिंकले, त्यातही दोन शिवसेनेच!

निफाड नगरपंचायत निवडणूक निकालाने अनिल कदम जोमात

Sampat Devgire

माणिक देसाई

निफाड : नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) व शहर विकास आघाडीचे राजाभाऊ शेलार, अनिल कुंदेनी बांधलेली मोट यशस्वी ठरली. निफाड नगरपंचायतीवर भगवा फडकला. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) तीनच जागा मिळाल्या. दोघे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आहेत. यानिमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लिटमस टेस्ट विद्यमान आमदार दिलीप बनकर हारले आहेत.

नगरपंचायतीत भाजप आणि शिवसेना प्रत्येकी पाच, राष्ट्रवादीचे ४, काँग्रेस, बसपा अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल होते. यंदा निवडणुकीसाठी त्रेचाळीस उमेदवार होते. वास्तविक पाहता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने स्थानिक पातळीवर तोच कित्ता गिरविला जाण्याचे संकेत होते. मात्र नेतेमंडळींच्या असमन्वामुळे ते धुळीस मिळाले. सत्तेचा संघर्ष महाविकास आघाडीच्या घटक पक्षातच झाला.

निफाडच्या भूमित गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्यातील संघर्षात तरुणाई विखुरलेली आहे. त्यामुळे कदम व बनकर यांच्या राजकीय संघर्षाचा अंक निफाडच्या रणागणांत पहायला मिळणार हे सर्वश्रुत होते आणि झालेही तसेच. पहिल्यापासूनच संयमी भूमिका घेत शिवसेना, शहर विकास आघाडी आणि मित्र पक्षांना सोबत घेऊन निफाडच्या मैदानामध्ये माजी आमदार अनिल कदम, राजाभाऊ शेलार आणि अनिल कुंदे यांनी यशस्वी नियोजन केले.

निफाड नगरपंचायतीवर एक हाती सत्ता आणली तर दुसरीकडे विधानसभेत मिळालेल्या यशाच्या जोरावर निफाड नगरपंचायतीचे सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. कदाचित काँग्रेसबरोबर आघाडी केली असती तर वेगळेच चित्र निर्माण झाले असते. तसे न झाल्याने विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना धक्का बसला आहे.

टायगर अभी जिंदा है

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना निफाड शहरात भरघोस मते मिळाली होती, मात्र नगरपंचायत निवडणुकीत दिलीप बनकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नागरिकांनी नाकारले आहे. आमदार दिलीप बनकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, याउलट शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी शहर विकास आघाडीचे राजाभाऊ शेलार यांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण करीत शिवसेनेचा भगवा निफाड नगरपंचयातवर फडकून टायगर अभी जिंदा है असा इशारा दिला आहे.

मागच्या निवडणुकीत राजाभाऊ शेलार यांनी भाजपचे नेतृत्व केल्याने भाजप शिवसेनेची सत्ता आली होती, यावेळी शेलार यांनी भाजपला सोडचिट्ठी देऊन शहर विकास आघाडी व शिवसेनेची मोट बांधून निफाड शहरावर आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. भाजपला एकही जागा तर मिळाली नाही, शिवाय बहुतेक उमेदवारांचे डोपॉझिट जप्त झाले आहे. काँग्रेस एक व बसपा १ व १ अपक्ष हे निवडून आलेले उमेदवार शहर विकास आघाडीचा पाठिंबा असलेले आहेत. नगरपंचायत निवडणुकीमध्ये निफाडकरांनी दिलेला कौल हा आगामी तालुक्यातील निवडणुकांची नांदी ठरणार आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT