BJP Ahmednagar Meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Ahmednagar Meeting : आमदार जगतापांच्या खेम्यात अस्वस्थता; भाजपच्या ठरावानं डोकेदुखी वाढवली

Pradeep Pendhare

Ahmednagar News : अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. भाजप नगर शहरात विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असून, जागेवरच दावा ठोकला आहे. तसा ठराव केला असून, भाजप प्रदेशकडे पाठवून, जागा भाजपच्या पदरात पाडून घेण्याची तयारी केली आहे.

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला जरी जागा गेली, तरी विधानसभा निवडणुकीत भाजप वेगळ्या भूमिकेत असणार असे राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. भाजपच्या या निर्धारानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगातप यांच्या खेम्यात अस्वस्थता पसरली आहे.

अहमदनगर शहर विधानसभेची जागा भाजपला (BJP) मिळावी, यासाठी शहरातील जुन्या-नव्या भाजप पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपला जागा मिळावी, असा ठराव घेण्यात आला. हा ठराव येत्या 25 सप्टेंबरला प्रदेश भाजपने मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठींसमोर मांडला जाणार आहे. पक्षांतर्गत वादविवाद दूर ठेवून अगोदर जागा पक्षाकडे खेचून आणू, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. भाजपच्या या निर्धारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे कार्यकर्ते अलर्ट झालं आहेत.

महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) आमदार नगर शहरात आहेत. अजित पवार यांच्या पहिल्या संभाव्य यादीत आमदार संग्राम जगताप यांचे देखील नाव समोर आलं आहे. त्यामुळे आमदार जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. असे असले, तरी भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा पंडीत दीनदयाळ परिवाराचे संस्थापक वसंत लोढा यांनी पक्षाकडे पत्र पाठवून नगर शहराची जागा भाजपला मिळावी, अशी मागणी केली आहे.

या अनुषंगाने भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, वसंत लोढा, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, बाबासाहेब सानप, नरेश चव्हाण, दामूशेठ बठेजा, बाळासाहेब भुजबळ, राजेंद्र काळे, अनिल मोहिते, सचिन पारखी, सुनील रामदासी, अच्युतराव पिंगळे, भय्या गंधे, प्रा. मधुसूदन मुळे, गोकुळ काळे, नरेंद्र कुलकर्णी अन्य उपस्थित होते.

मताधिक्क्य घटलं

या बैठकीत भाजपमधील अंतर्गत मतभेदांचा उल्लेख करताना मित्रपक्षांवरही शरसंधान साधले गेले. आपल्यात मतभेद तर आहेत, पण मित्रपक्षाकडूनही अवहेलना होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला 59 हजाराचे मताधिक्क्य नगर शहर विधानसभेतून असताना, आताच्या निवडणुकीत ते 32 हजार कसे राहिले, यावर देखील विचारमंथन करण्यात आले. किती काम केले, तरी पक्षाच्या वरिष्ठांकडून कौतुक होत नाही. कोणीही उमेदवार द्या, पण पक्षाशी एकनिष्ठ असलेला द्या. असे असले, तरी आपण आपली ताकद पक्षश्रेष्ठींना दाखवून देण्याची वेळ आली आहे, असा सूर बैठकीत पदाधिकाऱ्यांनी लावला.

भाजपला मतदार अनुकूल

केवळ निवडणूकच नाही, तर इतर कामांसाठीही आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. नगरची जागा भाजपलाच हवी. आपल्या घरातील भांडणे आपण नंतर पाहू. नगर शहरातील मतदार भाजपला अनुकूल आहेत. निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने झाली पाहिजे. विधानसभा तर आपण मिळवूच, पण भविष्यात महापालिकेतही भाजप सत्तेवर येईल. मात्र, त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे, असं बैठकीत ठरलं गेलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT