NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP News : महावितरणला राष्ट्रवादीचा दणका; बत्ती गुल करत गॅसबत्ती अन् मेणबत्तीची दिली भेट!

Pradeep Pendhare

Ahmednagar News : नगर शहरात गेल्या 15 दिवसांपासून विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त होते. राष्ट्रवादी काँग्रेसने यावर महावितरण कार्यालयातील दिवे बंद करत अधीक्षक अभियंता यांना गॅसबत्ती आणि मेणबत्ती पेटवून भेट दिली. या आंदोलनानंतर महावितरणकडून मान्सून पूर्व तयारी सुरू असल्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे सांगून बाजू झाकून नेली.

नगर शहरात गेले कित्येक दिवसापासून ग्राहकांना पूर्व कल्पना न देता वारंवार वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले. थोडा सोसाट्याचा वारा आला तरी, वीज पुरवठा खंडीत केला जातो. उष्णेतेची तीव्र लाट असताना बत्ती गुल होण्याचे प्रमाण वाढल्याने नगरकर त्रस्त झाले आहे. महावितरणच्या या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने गॅसबत्ती आणि मेणबत्ती पेटवून ती अधीक्षक अभियंता यांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) या अनोख्य आंदोलनाची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर शहरातील वीज पुरवठा सुरळीत सुरू न राहिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला. प्रा.माणिकराव विधाते, प्रकाश भागानगरे, अभिजित खोसे, केतन क्षीरसागर आदी आंदोलनात सहभागी झाले होते. राष्ट्रवादीच्या या आंदोलनावर महावितरणच्या नगर कार्यालयातून लेखी आश्वासन देण्यात आले आहे.

महावितरणच्या नगर कार्यालयाकडून लेखी आश्वासन -

नगर शहरातील वीज पुरवठा सुरळीत राहील, याकरीता सर्वतोपरी योग्य ते नियोजन आणि उपयोजना करण्यात येतील. सध्या मान्सूनपूर्व तयारीमुळे वीज पुरवठा खंडीत होत आहे. आपत्ती काळात तक्रार निवारण केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी फोनवर कार्यरत राहतील. फोन न उचलल्यास संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल.

तसेच नगर आणि उपनगरातील उपविभाग कार्यालय व कक्ष कार्यालय येथील तक्रार निवारण केंद्रातील दूरध्वनी क्रमांक जाहीर केले जातील. उघड्या डीपीचे दरवाजे आठ दिवसाच्या आत बंद करण्यात येतील. याशिवाय सावेडी आणि नालेगावातील कक्ष कार्यालयातील फोन न उचलणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन महावितरणच्या नगर कार्यालयाकडून देण्यात आले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT