Rupali Chakankar, Manikrao Kokate, Dhananjay Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rupali Chakankar : राष्ट्रवादीची तिसरी विकेट पडली, आधी धनंजय मुंडे नंतर माणिकराव कोकाटे अन् आता रुपाली चाकणकर

Rupali Chakankar resignation : राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने राष्ट्रवादीचे नेते अडचणीत आले. वादात अडकल्याने आतापर्यंत राष्ट्रवादीच्या तिसऱ्या नेत्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra politics : वेगवेगळ्या कारणांनी वादात सापडल्याने यापूर्वी राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. आता राष्ट्रवादीची तिसरी विकेट पडली आहे. कारण नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे.

याआधी राष्ट्रवादीचे नेते व तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडशी संबंध असल्याच्या मुद्द्यावरून चहुबाजूंनी टीका करण्यात आली होती. त्यामुळे प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत मुंडे यांनी त्यावेळी राजीनामा दिला होता. 2024 मध्ये सत्तेत आलेल्या महायुती सरकारमधील मंत्र्याला वादामुळे राजीनामा द्यावा लागल्याची ती पहिलीच वेळ होती.

त्यानंतर राष्ट्रवादीचे सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांना कृषी खाते मिळाले. माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच मंत्री झाले. मात्र शेतकऱ्यांविषयी केलेली वादग्रस्त वक्तव्य, सभागृहात त्यांच्यावर रमी खेळल्याचा केला गेलेला कथित आरोप यासर्व मुद्यांमुळे त्यांचे कृषी खाते काढून घेण्यात आले. त्यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद देण्यात आलं.

मात्र, त्यानंतर सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिकच्या सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून कोकाटे यांनी आपल्या क्रीडा मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

आता नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आरोप झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना देखील राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला.

महायुतीचे सरकार सत्तेत येऊन दीड वर्षही झालेले नाही, मात्र या काळात राष्ट्रवादीच्या तीन मोठ्या नेत्यांचे राजीनामे झाले आहेत. राजीनाम्यानंतर अद्याप धनंजय मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन होऊ शकलेले नाही. तसेच माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या क्रीडा, युवक कल्याण आणि अल्पसंख्यांक विकास विभागाचा कारभार सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत.

नाशिक येथील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याला लैंगिक छळ आणि बलात्काराच्या आरोपांखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची खरात सोबतची छायाचित्रे आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी पद सोडलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT