MP Bhaskar Bhagare
MP Bhaskar Bhagare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhaskar Bhagare Politics : राष्ट्रवादीच्या खासदाराने संसदेतही दिली प्रचारातील घोषणा, मात्र फक्त अर्धी!

Sampat Devgire

Bhaskar Bhagare News : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक घोषणा होती. ती सबंध राज्यभर चर्चेचा विषय होती. मंगळवारी संसदेत शपथ घेतानाही खासदार भास्कर भगरे यांनी यातील अर्धी घोषणा संसदेत दिली.

दिंडोरीचे खासदार भगरे यांनी मंगळवारी संसदेत शपथ घेतली. गांभीर्यपूर्वक शपथ घेतल्यानंतर, शेवटी त्यांनी जय हिंद. जय संविधान. जय महाराष्ट्र आणि शेवटी निवडणूक प्रचारातील त्या बहुचर्चित घोषणेचा भाग असलेले 'राम कृष्ण हरी'असे म्हटले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे होते. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता प्रचार करताना आणि प्रत्येक नेता भाषणाचा समारोप करताना 'राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी' असे म्हणत असत. आज संसदेत शपथ घेताना देखील खासदार भगरे यांनी यातील अर्धे 'राम कृष्ण हरी' हे शब्द उच्चारलेच. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने तो चर्चेचा विषय ठरला.

खासदार भगरे हे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शाळेत शिक्षक आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातून पहिल्यांदाच एक शिक्षक लोकसभेवर निवडून गेला आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांनी प्रचारात अगदी मनापासून भाग घेतला होता. अनेक शिक्षकांना भगरे हे आपले प्रतिनिधी असल्याचे समाधान वाटते.लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भगरे यांच्यावर विश्वास दाखवित त्यांना उमेदवारी दिली होती.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांचा भगरे यांनी दीड लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. एक सामान्य आणि आर्थिक दृष्ट्या साधारण गटातील उमेदवार म्हणून भगरे यांच्याकडे पाहिले जाते. मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते शेतकरी आणि नागरिकांनी त्यांना नोट आणि व्होट दोन्हीही दिले होते. त्यामुळे बलाढ्य पक्षाच्या बलाढ्य उमेदवाराचा साधारण शिक्षक असलेल्या भगरे यांनी पराभव केल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT