New Delhi : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. एनडीए सरकारकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, विरोधकांनी या निवडणुकीत उमेदवार उतरवत सरकारचं टेन्शन वाढवलं आहे.
भाजपचे खासदार ओम बिर्ला यांनी मंगळवारी सकाळी एनडीएचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनीही विरोधकांकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विरोधकांची मनधरणी करण्यात सरकारला अपयश आल्याने इतिहास पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे.
अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून मल्लिकार्जून खर्गे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, एम. के. स्टॅलिन यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची चर्चा होती. सुरूवातीला विरोधकांनी बिनविरोध निवडणुकीसाठी सहमदी दर्शवल्याचे सांगितले जात होते. उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची अटीवर ही तडजोड झाली होती.
मात्र, इंडिया आघाडीची वाढलेली ताकद दाखवण्यासाठी विरोधकांनी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. हंगामी अध्यक्षपदाच्या निवडीवरून विरोधकांंनी सरकारला धारेवर धरले होते. याच कारणामुळे विरोधकांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. बुधवारी सकाळी मतदान होणार आहे.
काँग्रेसने उतरवलेले के. सुरेश हे आठव्यांदा खासदार झालेले आहेत. तेच हंगामी अध्यक्ष म्हणून योग्य असल्याचा काँग्रेसचा दावा होता. पण भाजपकडून हा दावा खोडून काढण्यात आला. आता विरोधकांनी के. सुरेश यांनाच मैदानात उतरवले आहे.
दरम्यान, एनडीए सरकारकडील संख्याबळ पाहता ओम बिर्ला यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पण विरोधकांनाही या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच आपली ताकद दाखवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे एनडीए आणि इंडिया आघाडीला कुणा-कुणाचा पाठिंबा मिळतोय, याचीही उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.