Jaykumar Gore Rohit Pawar controversy : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातील घुमरी (ता.कर्जत) ग्रामपंचायतीवर भाजप मंत्री जयकुमार गोरे यांनी कारवाई करत दणका दिला आहे.
मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी असलेला निधी वापराकडे दुर्लक्ष केल्याने घुमरी (ता. कर्जत) ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ग्रामपंचायत बरखास्तीचा आदेश काढला आहे.
घुमरी इथल्या ॲड. शिवाजीराव अनभुले आणि ग्रामस्थांनी 27 ऑगस्ट 2024रोजी ग्रामपंचायतीने त्यांच्या उत्पन्नातील 15 टक्के निधी मागासवर्गीय समाज घटकांच्या विकासासाठी खर्च न केल्याची तक्रार केली होती. ग्रामपंचायतीने 2021-22 या आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या 15 टक्के रक्कम 22 हजार 619 आणि 2023-24 या आर्थिक वर्षातील 33 हजार 67 रुपये, असे एकूण 55 हजार 686 रुपये खर्च केले नाहीत, अशी तक्रार केली होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना या तक्रारीच्या चौकशीचा आदेश दिला. त्यांनी चौकशी करून ग्रामपंचायतीने मागासवर्गीयांसाठीचा निधी खर्च केला नसल्याचा अहवाल सादर केला. ॲड. अनभुले यांनी ग्रामपंचायत बरखास्तीसाठी भाजपचे (BJP) ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे अपिल दाखल केले होते. त्यांच्यावतीने ॲड. एल. के. गोरे यांनी युक्तिवाद केला.
महाराष्ट्र (Maharashtra) ग्रामपंचायत अधिनियम 1954च्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतीने मागासवर्गीय समाज घटकांचा निधी खर्च करणे बंधनकारक होते. सरपंच आणि सदस्य हे कर्तव्य पार पडण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत बरखास्त करण्याचे म्हणणे सादर केले.
सरपंच संगीता अनभुले आणि सदस्यांच्यावतीने बचाव करण्यात आला की, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे चौकशीसाठी ग्रामपंचायतीमध्ये आले नाहीत. निधी खर्च करण्यासाठी कोणतेही मार्गदर्शन केले नाही. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत बरखास्तीचा प्रस्ताव सादर केलेला नाही.
सरपंच आणि सदस्यांना म्हणणे सादर करण्याची कोणतीही संधी दिली नाही. त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्वाचे पालन झालेले नाही. विरोधकांचा निवडणुकीत दारूण पराभव झाल्याने राजकीय हेतूने खोट्या तक्रारी करत आहेत. ग्रामविकास मंत्र्यांनी हे म्हणणे फेटाळून लावले. घुमरी ग्रामपंचायत बरखास्तीचा आदेश दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.