Ahilyanagar News : खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पारनेर विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. खासदार लंके यांनी हा पराभव म्हणजे ट्रॅप असल्याचे म्हटले.
"लोकसभा निवडणुकीत पराभव केला म्हणून माजी खासदार सुजय विखे यांनी 'ईव्हीएम' मशीनच्या माध्यमातून माझ्याविरोधात ट्रॅप लावला, असा आरोप करताना महिन्याभरात गुड न्यूज देतो", असा दावा करत राजकीय उत्सुकता खासदार लंके यांनी ताणून ठेवलीय.
विधानसभा निवडणुकीतील पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी मेळावा घेत भूमिका मांडली. खासदार लंके चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर शरसंधान सोडतानाच समर्थकांचेही कान टोचले. लंके म्हणाले, "या निवडणुकीत यांत्रिकीरणाने घात केला. कोणी काही म्हणत असेल, तर मी आमदार नाही, तर आज खासदार आहे.
प्रस्थापित आणि घराणेशाही विरोधात माझा उदय झाला आहे. त्यामुळे संघर्ष मला नवा नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असे सांगत समर्थकांचे कान टोचताना विधानसभा निवडणुकीत सतर्क राहिले असते, तर आपल्या वाटयाला हा पराभव आला नसता", एकमेकांमधील जिरवाजिरवीचे राजकारण आता बंद करा, असा सल्लाही खासदार लंके यांनी समर्थकांना दिला.
"निवडणूक (Election) ही बंदूकीची गोळी असते. एकदा सुटली की सुटली. राजकारणात आज जाती-धर्माचा रंग दिला जात असून एक दिवस भारताचा श्रीलंका झाल्याशिवाय राहणार नाही. देश एकसंघ राहण्यासाठी जाती-पातींचे राजकारण योग्य नाही. आपले भविष्य उज्ज्वल आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला विसरणार नाही.
भल्या-भल्यांना नेस्तनाबूत करण्याची धमक आणि ताकद आहे. कोणी म्हणत असेल सरकार, आमदार आम्ही आहोत. मात्र एका रात्रीत सत्तेत येऊन मांडीला मांडी लावून आम्हीही बसू शकतो. एक महिन्याच्या कालावधीत एक गुड न्यूज देणार", असा सूचक इशारा खासदार लंके यांनी म्हटले.
"विधानसभा निवडणुकीत काठावर पराभव झाला हा निश्चितच चिंतनाचा भागा आहे. तुम्ही आत्मचिंतन करा. आजचा व येणारा काळही आपलाच आहे. नीलेश लंके हा उगवता सूर्य आहे, तो खचत नाही. चुक झाली ती झाली, आता आरोग्य शिबिराचे आयोजन करून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरवात करू या", असे खासदार नीलेश लंके यांनी म्हटले.
आपण आपल्या कामाच्या जोरावर राज्यात ओळख निर्माण केली आहे. विधानसभेत पराभव झाला म्हणून आपले राजकारण संपलेले नाही. चुकांच्या दुरूस्त्या करा. समाजाला दोष देऊ नका. कामातून लोक जोडत चला. थांबू नका. कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये मिसळला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाला लागण्याची सूचना खासदार नीलेश लंके यांनी केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.