Ajit Pawar, Sharad pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का, एकाचवेळी दोन माजी मंत्री अन् दोन माजी आमदार सोडणार साथ

Satish Patil and Gulabrao Deokar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन माजी मंत्री पक्षाची साथ सोडून अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : जळगाव जिल्ह्यातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन माजी मंत्री व दोन माजी आमदार पक्षाची साथ सोडून अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत.

त्यात ३५ वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत असणारे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या गटात आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचाही अजित पवार गटात होणारा प्रवेश काही महिन्यांपासून रखडला होता. मात्र, गुलाबराव देवकर यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्तही लवकरच ठरणार असल्याची माहिती आहे. जिल्हा बॅंकेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, तिल्लोतमा पाटील व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार असून या बैठकीत देवकर यांच्या प्रवेशाचाही मुहूर्त ठरवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पारोळा -एरंडोल मतदारसंघातून डॉ. सतीश पाटील यांनी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु ते पराभूत झाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी डॉ. सतीश पाटील यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला दुजोरा दिला आहे. संजय पवार यांनी काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील दोन माजी मंत्री, दोन माजी आमदार व काही बडे पदाधिकारी शरद पवार गट सोडून अजित पवार गटात येतील असे सांगितले होते.

त्यानुसार देवकर व पाटील यांच्यासह आणखी दोन माजी आमदार, जिल्हा बॅंकेच्या माजी संचालिका यांच्यासह काही मोठे पदाधिकारीही लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल होणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी स्वत:च तशी माहिती दिली आहे.

डॉ. सतीश पाटील यांची आज त्यांच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांशी ते या संदर्भात चर्चा करणार आहेत. मात्र प्रवेश निश्चित असून २ मे रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत आपण मुंबई येथे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहोत अशी माहिती पाटील यांनी स्व: दिली आहे.

सतीश पाटील यांच्या पक्ष सोडण्यामुळे जळगाव जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षाला चांगलाच फटका बसणार आहे. गेल्या 35 वर्षांपासून मी शरद पवारांचा पाईक असून निष्ठावान आहे. पण पक्षात माझ्यावर अन्याय होत असेल आणि कार्यकर्त्यांच्या काही वेगळ्या भूमिका असतील तर मला त्यांच्यासोबत जावे लागेल, असे डॉ. सतीश पाटील यांनी म्हटले होते.

दरम्यान, पाटील व देवकर या दोघांचाही जळगाव जिल्ह्यात जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जिल्ह्यातील इतरही अंसख्य कार्यकर्ते अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शरद पवार गटाला मोठा फटका बसू शकतो. तसेच या दोनही माजी मंत्र्यांच्या प्रवेशाने अजित पवार गटाला चांगले बळ मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT