NCP Agitation in Jalgaon
NCP Agitation in Jalgaon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP News: `राष्ट्रवादी`चे आयुक्तांच्या गाडीसमोर झोपून आंदोलन

Sampat Devgire

जळगाव : शहरातील (Jalgaon) रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक भागांत स्वच्छताही होत नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झाली आहे. गुरुवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेसमोर (Jalgaon Corporation) तीव्र निदर्शने करून आवारात ठिय्या मांडला. यावेळी काही पदाधिकारी चक्क आयुक्तांच्या वाहनापुढे झोपले. (Jalgoan city facing civic issues due to inactive Municiple administration)

याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले. शहरातील समस्या न सोडविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांनी प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडीच्या महानगरप्रमुख मंगला पाटील, महानगराध्यक्ष रिंकू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, यात म्हटले आहे, जळगाव शहरातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सर्वच भागातील रस्त्यांना खड्डे पडले आहेत. शहरातील रस्त्यांची कामे एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही केली जात नाहीत, हा नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे.

महापौर, उपमहापौर, नगरसेवक व आमदार यांनी शिवाजीनगर पुलाप्रमाणे शहरातील रस्त्याच्या कामांचे भिजत घोंगडे ठेवले आहे. यामुळे नागरिकांना मात्र त्रास होत आहे. पाणीपुरवठाही वारंवार खंडित होत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील रस्त्याची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी, तसेच स्वच्छताही लवकर करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. निवेदनावर भगवान सोनवणे, यशवंत पाटील, किरण राजपूत, अशोक सोनवणे, अमोल कोल्हे आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आयुक्तांच्या वाहनासमोर ठिय्या

आंदोलकांचे निवेदन न स्वीकारताच आयुक्त विद्या गायकवाड निघत होत्या. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या वाहनासमोरच ठिय्या मांडला. आमच्या मागण्या पूर्ण करा, अशी मागणी केली. आयुक्त शहरातील काम करण्यास अपयशी ठरल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. या वेळी महापौर जयश्री महाजन यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT