Maharashtra Government : NEET परीक्षा राज्य सरकारने घ्यावी, असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर करणार असल्याचे भाजपचे नेते तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
राज्य सरकारमार्फत NEET परीक्षा घेतल्यास खासगी क्लासेसच्या नावाखाली पालकांची होणारी आर्थिक लूट कमी होण्यास मदत होईल, तसेच विद्यार्थ्यांमधील जीवघेणी स्पर्धाही कमी होऊ शकते, असा दावा त्यांनी केला.
राज्य सरकारने NEET परीक्षा घेतल्यास शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयांची जबाबदारी वाढेल, असे विखे पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी या संस्थांवर अधिक प्रभावीपणे येईल. याबाबतही पंतप्रधानांचे लक्ष प्रस्तावाद्वारे वेधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावर टीका करताना विखे पाटील यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. NEET परीक्षा यापूर्वीपासूनच घेतली जात आहे. त्या वेळी केंद्रात त्यांचेही सरकार होते; मग तेव्हा हे प्रश्न का उपस्थित केले नाहीत? आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेतला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
विखे पाटील गेल्या काही दिवसांपासून NEET आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या पार्श्वभूमीवर खासगी क्लासेसच्या शुल्काबाबत आणि पालकांवर पडणाऱ्या आर्थिक भाराबाबत भूमिका मांडत आहेत. खासगी क्लासेसवर आवश्यक निर्बंध आणण्याबरोबरच शाळा आणि महाविद्यालयांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आवश्यक आहे, अशी त्यांची भूमिका आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी आणि नियमनासाठी ‘महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, 2026’ या प्रस्तावित कायद्याचा प्रारूप मसुदा तयार केला आहे. या मसुद्यावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत.
शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा मसुदा उपलब्ध असून, 4 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुण्यातील शिक्षण आयुक्त किंवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांच्या कार्यालयाकडे सूचना व हरकती सादर करता येणार आहेत. प्राप्त सूचनांचा एकत्रित अहवाल 20 सप्टेंबरपर्यंत सरकारला सादर केला जाणार आहे.
त्यामुळे एकीकडे खासगी शिकवणी केंद्रांच्या नियमनासाठी कायद्याचा मसुदा पुढे येत असतानाच, दुसरीकडे NEET परीक्षा राज्य सरकारने घ्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव पंतप्रधानांकडे मांडण्याची घोषणा विखे पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या प्रस्तावामुळे NEET परीक्षा पद्धती, खासगी क्लासेसचे नियमन आणि शासकीय शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेबाबतची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.