Ahmednagar News : खासदार नीलेश लंके यांनी त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावरून नगरसह राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट करत अपेक्षा व्यक्त केली आहे. 'उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राज्याचे गृहमंत्री पदाची जबाबदारी असून, त्यांनी या हल्ल्याच्या घटनेची तातडीनं दखल घेऊन फडणवीस कारवाई करतील', अशी अपेक्षा खासदार लंके यांनी व्यक्त केली आहे.
पारनेरमधील बसस्थानकावर गुरुवारी भरदुपारी खासदार नीलेश लंके(Nilesh Lanke) यांचे कायदेशीर सल्लागार राहुल झावरे आणि स्वीय सहाय्यक संदीप चौधरी यांच्यावर हल्ला झाला. विखे समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप लंके यांच्या समर्थकांकडून होत आहे. काही कारणांवरून विखे आणि लंके यांचे दोन गट समोरासमोर येऊन मोठा राडा झाला.
यात राहुल झावरे गंभीर जखमी झाले. त्यांच्या छातीला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केले गेले. आता या हल्ल्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या हल्ल्यावरून विरोधकांवर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नीलेश लंके यांनी देखील यावर आपले मौन सोडले आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे नगरसह राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे. "महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची धिंड काढणारी आणि भाजपची गुंडगिरी सांगणारी ही घटना आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन, कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे.
तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक सलोख्याने गुन्हेगारीकरण करणाऱ्या या प्रवृत्तींना कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावे", असेही खासदार लंके यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. "राजकारणात जय, पराजय होत असतो. दोन्हीही पचविण्याची ताकद असावी लागते. विजयानं उन्मादून जायचं नसतं आणि पराजयान खचून जायचं नसतं. विरोधकांनी आता पराजय स्वीकारला पाहिजे", असे काळे यांनी म्हटले आहे.
पारनेरमधील या राड्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पारनेरमधील संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या विखे समर्थकांपैकी काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आणखी काही जणांना ताब्यात घेण्याची रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरू होती.' अशी माहिती पारनेर पोलिसांकडून मिळाली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.