Sujay Vikhe, Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : खासदार लंकेंचा विखेंना दणका; महापालिकेतील तो ठराव विखेंच्या अंगलट येणार

Nilesh Lanke suggestion to split the Vikhe Foundation resolution : खासदार नीलेश लंके यांनी विखेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. नगर तालुक्यातील विळद घाटातील विखे फाऊंडेशनला तीन कोटी रुपयांची पाणीपट्टी माफीचा ठराव विखंडीत करून सरकारकडे पाण्याच्या सूचना खासदार नीलेश लंके यांनी दिल्या.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : विखे-लंके यांच्यातील संघर्ष आगामी काळात तीव्र होताना दिसतो आहे. सुजय विखे यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. याचवेळी खासदार नीलेश लंके यांनी विळद घाटातील (ता. नगर) विखे फाऊंडेशनला तीन कोटी रुपयांची पाणीपट्टी कशावरून माफ केली? यावरून महापालिका प्रशासनाला घेरलं.

महापालिकेच्या आर्थिक हिताचा हा ठराव नसून, तो विखंडीत करून राज्य सरकारकडे पाठवावा, अशा सूचना खासदार नीलेश लंके यांनी केल्या. खासदार लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसते.

खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थित महापालिकेची आढावा बैठक झाली. शहर पाणीपुरवठा आणि केंद्र सरकारच्या पाणी योजनेचा आढावा घेतला. आयुक्त यशवंत डांगे यांनी पाणी पुरवठ्यासंदर्भात सर्व माहिती खासदार लंके यांना सादर केली. शिवसेना (Shiv Sena) ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून विखे फाऊंडेशनला 28 नळ कनेक्शन बेकायदेशीरपणे देण्यात आल्याकडे लक्ष वेधले. याची सर्व मिळून पाणीपट्टी 3 कोटी होते. ही पाणीपट्टी माफ करण्याचा ठराव महापालिकेत घेण्यात आल्याकडे देखील गिरीश जाधव यांनी लक्ष वेधले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी याच मुद्यावरून महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. नगर शहराच्या पाणी योजनेवर 250 कोटीहून अधिक खर्च होवून देखील नगरकरांना रोज दोन वेळ पाणी मिळत नाही. नगर शहराच्या हद्दीबाहेर महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून बेकायदेशीरपणे 24 तास पाणीपुरवठा सुरू आहे. थकबाकीपोटी नगर शहरातील नागरिकांचे नळ कनेक्शन तोडले जात आहेत आणि दुसरीकडे 3 कोटी रुपये कशाच्या आधारावर माफ केले, असा सवाल खासदार नीलेश लंके यांनी महापालिका प्रशासनाला केला.

खासदार नीलेश लंके यांनी हा ठराव महापालिकेला आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. त्यामुळे तो विखंडीत करून नगर विकास विभागाकडे तत्काळ पाठवा,अशा सूचना केल्या. जल अभियंता परिमल निकम यांनी पाणीपुरवठा विभागाशी निगडीत माहिती दिली. खासदार लंके यांनी यावर खोटी माहिती देवू नका. नाहीतर लक्षवेधी मांडून तुमच्यावर कारवाईची मागणी करेल, असा इशारा दिला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन मुळा धरणापासून ते नगरपर्यंत संपूर्ण पाणी योजनेची माहिती घेणार असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.

तत्कालीन महापौर रोहिणी शेंडगे यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या कंत्राटी अभियंत्यांना सेवेत कायम करण्याच्या ठराव रेंगाळला आहे. सुमारे वर्षभरापासून हा प्रस्ताव पडून आहे. यावर खासदार नीलेश लंके यांनी आस्थापना प्रमुख मेहेर लहारे यांना दोन दिवसात हा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याच्या सूचना केल्या. तसेत सातव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावाची माहिती घेत या दोन्ही प्रस्तावसंदर्भात समक्ष मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचेही नीलेश लंके यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT