MVA Delimitation Controversy : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने, केंद्रातील भाजप मोदी सरकार आणत असलेल्या डिलिमिटेशन विधेयकावर घेतलेल्या भूमिकेवर, महाविकास आघाडीतील मित्रपक्षाने जोरदार टीकास्त्र सुरू केले आहे. काँग्रेसचे नेते थेट समोर येत शरद पवार राष्ट्रवादीविरोधात बोलू लागले आहेत.
तसेच सोशल मीडियावरून टार्गेट केले जात आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार नीलेश लंके यांनी, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाला सुनावत, दीडशे कोटीच्या अमिषांचे खंडन केले आहे. तुम्ही बळच एखाद्याला चुकीच्या पद्धतीने कोपऱ्यात ढकलू शकत नाही, अशा शब्दात खासदार लंकेंनी म्हटले आहे.
खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले, "काँग्रेस अन् शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने नाराज होण्याची काहीच गरज नाही. आम्ही अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. तुम्ही बळच एखाद्याला कोपऱ्यात ढकलत असाल, तर चुकीचे आहे. आम्ही त्या बिलाचा अभ्यास केलेला नाही. त्यावर निर्णय घेतलेला नाही. असे असतानाच, चुकीच्या पोस्ट करणे चुकीचे आहे."
शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते (Shivsena UBT) खासदार संजय राऊत यांनी, शरद पवार आजारी असल्याने हे बिल आणण्याचे धाडस केले आहे. खासदारांनी दीडशे कोटी दिले जात आहे. या आरोपांवर नीलेश लंके म्हणाले, "त्यांना काही माहिती असेल, हे मला माहिती नाही. आमच्या पक्षाच्या तरी खासदाराला दीडशे कोटी मिळाले किंवा अमिष दाखवले, अशा कोणत्याही गोष्टी आमच्या कानावर आलेल्या नाही."
डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवार राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका आहे, यावर बोलताना खासदार लंके म्हणाले, कोणतेही बिल संसदेत येणार असेल, तेव्हा आम्ही त्याचा पूर्णपणे अभ्यास करतो. बारकावे शोधल्याशिवाय आम्ही निर्णयावर जात नाही. डिलिमिटेशन महत्त्वाचे बिल आहे. त्यावर अभ्यास करणार, त्यातील बारकावे अभ्यासणार, त्यानंतर शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेऊ.
इंडिया आघाडीची दिल्लीत या विधेयकावर चर्चा करण्यासाठी बैठक आहे. त्या बैठकीला शरद पवार राष्ट्रवादी हजर नाही. यावर बोलताना खासदार लंके म्हणाले, "इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया सुळे नेहमीच हजर असतात. परंतु शरद पवार साहेब आजारी असल्याने त्यांना जाता आले नाही. त्यांच्यानंतर बैठकीला हजेरी लावण्याची जबाबदारी माझ्याकडे आली होती. परंतु माझी पूर्वनियोजित तोरणा मोहीम असल्याने मला देखील जाणे शक्य नाही." तोरणा मोहीम उरकल्यानंतर मी जाण्याचा प्रयत्न करेल, असेही खासदार लंके यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशन विधेयकाला दोन दिवसापूर्वी सशर्त पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली होती. सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा समान 50 टक्क्यांनी वाढवण्याची अट त्यांनी मांडली. जितेंद्र आव्हाड यांच्या या भूमिकेवरून मविआमधील मित्रपक्ष काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष शरद पवार राष्ट्रवादीच्या भूमिकेवर चांगलाच नाराज झाला. यानंतर नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाचा मसुदा तपासून भूमिका स्पष्ट करणार असल्याची सावरासावर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.