Nilesh Lanke Protest Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke : खासदार लंकेंनी घातली गळ्यात कांद्याची माळ; जिल्हाधिकाऱ्यांना दिली खास भेट

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : खासदार झाल्यानंतर नगरमध्ये नीलेश लंके यांनी शुक्रवारी पहिले आंदोलन केले. गळ्यात कांद्याची माळ घालून व डोक्यावर "मी शेतकरी..." लिहिलेली टोपी घालून बैलगाडीतून आलेल्या खासदार लंकेंसह महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी दूध व कांद्याच्या दरात वाढ करण्याची मागणी केली. या आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांना संविधान प्रत भेट देण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर लंके Nilesh Lanke यांनी दूध व कांदा दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलनाची तयारी केली होती. मात्र, त्यावेळी लोकसभा निवडणूक आचारसंहिता सुरू होती व नंतर शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने त्यांना आंदोलन करता आले नाही. मात्र, आता दोन्ही आचारसंहिता संपल्याने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन आंदोलन करण्यात आले.

मोर्चात सहभागी आंदोलकांनी डोक्यावर "मी शेतकरी...", असे लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. सर्वांच्या गळ्यात कांद्याच्या माळा होत्या. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मनपा मुख्यालयाजवळ असलेल्या पावन गणपती मंदिरापासून बैलगाडीतून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.

यात राष्ट्रवादी शरद पवार Sharad Pawar गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, शिवसेना ठाकरे सेना शहर प्रमुख संभाजी कदम, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, अनिल ठवाळ, प्रा. सीताराम काकडे, मधुकर राळेभात आदी शेतकरी सहभागी झाले होते.

पोलिसांना दुधाचे वाटप

कांदा व दुधाला बाजारभाव मिळावेत, अशा मागण्यांचे फलक सर्वांच्या हाती होते. गायी-म्हशीही मोर्चात होत्या व म्हशींच्या पाठीवरही मागण्या लिहिल्या गेल्या होत्या. टाळ-मृदुंगाचा गजर करीत भजनी मंडळही व महिलाही मोर्चात होते.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर बॅरीकेडस लावून अडवला गेला. तेथे मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. खासदार लंके यांच्या समर्थकांनी प्लॅस्टिकच्या चार-पाच बाटल्यांतून दूध आणले होते व ते बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना कपातून वाटण्यात आले.

संपूर्ण कर्जमाफीची मागणी

शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी तसेच कांदा व दूध उत्पादक शेतकर्‍यांचे प्रश्न व दूध दराच्या प्रश्नांबाबत कायमस्वरुपी कायदा करण्यात यावा, अशा मागण्या मोर्चेकर्‍यांनी निवेदनाद्वारे केल्या. दुधाला 40 रुपये हमीभाव देण्याची शेतकर्‍यांची मागणी आहे. सध्याच्या अल्प भावामुळे उत्पादन खर्चही निघत नाही. त्यात केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतल्याने व ही आयात करमुक्त असल्याने दूध उत्पादकांना त्याचा फटका बसणार असल्याने दूध उद्योगाचे नियमन करणारा कायदा करावा तसेच कांदा व अन्य शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा, अशी मागणी करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT