Nirmala Gavit, Sanjay Raut & Hiraman Khoskar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hiraman Khoskar Politics: काँग्रेसने नाकारलेले आमदार खोसकर आता उमेदवारीसाठी मातोश्रीच्या दारी?

Congress Rejected MLA Khoskar Now Seeks Candidacy at Matoshree’s Doorstep: उमेदवारीच्या अनिश्चिततेमुळे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचे राजकीय भवितव्य अडचणीत?

Sampat Devgire

Khoskar Vs Gavit: विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्या मुळे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर चर्चेत आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत आहेत. त्यामुळे आमदार खोसकर काय करणार? हा सध्या चर्चेचा विषय आहे.

काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्या नावावर काँग्रेस पक्षाने उमेदवारीसाठी फुली मारली आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेले आमदार खोसकर अनेक नेत्यांच्या संपर्कात आहेत. महायुतीच्या नेत्यांकडून उमेदवारीसाठी त्यांची चाचपणी जवळपास अयशस्वी ठरली आहे.

इगतपुरी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडी सध्या अतिशय गतिमान झाल्या आहेत. या मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडे १५ इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. यातील बहुतांशी इच्छुक फारसे प्रभावी नाहीत.

त्यामुळे स्थानिक नेत्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. काही नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यातील इच्छुकांना उमेदवारी मिळवून देणार, असे आश्वासनच देऊन टाकले आहे. या नेत्यांसह विविध इच्छुक सातत्याने काँग्रेसच्या वरिष्ठांची भेट घेत आहेत.

सध्या नेमके इच्छुक किती आणि उमेदवारी मिळणार कोणाला यावरून चांगलाच गोंधळ आहे. अनेकांना उमेदवारीची स्वप्न पडू लागली आहेत. आमदार खोसकर यांनी त्या गोंधळात आणखी भर टाकली आहे.

संदीप गुळवे यांनी शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारीसाठी नुकताच काँग्रेस पक्षातून शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. श्री गुळवे हे खोसकर यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी नुकतीच खोसकर यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची भेट घेतल्याचे कळते.

बडगुजर यांच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क केल्याचे बोलले जाते. इगतपुरी मतदार संघात आमदार खोसकर यांचा प्रभाव आहे, असा दावा आमदार गुळवे यांनी संजय राऊत यांच्याकडे केल्याचे कळते.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांना इगतपुरी विधानसभा मतदारसंघात मिळालेली एक लाख मते हिरामण खोसकर यांच्यामुळेच मिळाली, असा दावाही या नेत्यांनी केल्याचे कळते. काँग्रेसने नाकारलेले आमदार खोसकर शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट दोन्हीही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत. इगतपुरी मतदार संघ काँग्रेस पक्षाकडे आहे. अशा स्थितीत काँग्रेस पक्षाने शिक्षा म्हणून नाकारलेल्या आमदार खोसकर यांच्यासाठी शिवसेना ठाकरे गट इगतपुरी मतदार संघाची मागणी करू शकेल काय? हा प्रश्नच आहे.

राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाला आमदार खोसकर यांच्याबाबत शिवसेनेचा निर्णय मान्य होईल काय? असा देखीव प्रश्न यातून निर्माण झाला आहे. आमदार खोसकर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्याकडे देखील उमेदवारीसाठी प्रयत्न केला होता. आता आमदार खोसकर थेट शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

येथील माजी आमदार निर्मला गावित या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. श्री. गुळवे यांचे त्यांच्याशी राजकीय सख्य नाही. त्यामुळे गेल्या निवडणुकीत माजी आमदार गावित या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारी होत्या. त्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. मात्र त्यांचा मतदार संघात चांगला संपर्क आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी त्यांची जोरदार तयारी देखील आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना हा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला मिळावा यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते. माजी आमदार गावित या इगतपुरी मतदार संघातील एक प्रबळ उमेदवार म्हणून परिचित आहेत. त्या येथून दोन टर्म आमदार होत्या. असे असताना आमदार खोसकर उमेदवारीसाठी मातोश्रीच्या दारी गेले आहेत. त्यात ते यशस्वी होतील का हा चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT