Protest of Nitesh Rane in Malegaon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nitesh Rane : 'तुमच्या मतदारसंघात काय दिवे लावलेत ते सांगा?' मालेगावातील हिंदू-मुस्लिमांचा भाजपच्या 'या' नेत्याला सवाल

Sampat Devgire

Malegaon Political News :

मालेगावविषयी वारंवार वादग्रस्त आणि द्वेषपूर्ण वक्तव्ये करणारे भाजप आमदार नितेश राणे यांचे बॉस कोण आहेत, असा सवाल मालेगावकरांनी विचारला आहे. एवढेच नाही आधी तुम्ही तुमच्या मतदारसंघात काय दिवे लावले आहेत, ते सांगा, असा सवालही मालेगावकरांनी विचारला आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) अलीकडेच मालेगावबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. याचा मालेगावमधील हिंदू-मुस्लीम अनेक संघटनांनी एकत्र येत निषेध केला आहे.

भाजप (BJP) आमदार नितेश राणे यांनी मालेगाववर वीजचोरीचा आरोप करताना मालेगाव मिनी पाकिस्तान (Mini Pakistan) असल्याचा गंभीर आरोप केला होता. यावरून शहरात हिंदू-मुस्लीम संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जमून सर्वांनी नितेश राणे यांचा निषेध केला. त्याचवेळी राणे यांचा बॉस कोण? असा प्रश्न करून राणे हे द्वेषाने पछाडलेले आहेत, असा आरोपही केला.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मालेगाव शहरासंदर्भात केलेल्या उल्लेखाचे राजकीय संबंध धुळे लोकसभा मतदारसंघाशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. या मतदारसंघातील सत्ताधारी आघाडीचे इच्छुक उमेदवार हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील दरी वाढवून त्याचा लोकसभा निवडणुकीसाठी फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांकडूनच राणेंना फीडबॅक देण्यात आला असावा. त्यातून राणेंनी निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी मालेगाव (Malegaon) शहराची बदनामी केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

आमदार राणे हे वारंवार मालेगाव शहराची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. मालेगाव शहरात पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेतानाही नितेश राणेंनी मालेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान असाच केला होता.

आता देखील आमदार नितेश राणेंनी वीजचोरीच्या प्रश्नावरून शहराची बदनामी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाच्या ज्या लोकांना धुळ्याचे खासदार होण्याचे डोहाळे लागले आहेत ते असले प्रकार करत असल्याचा आरोप या संघटनांनी केला.

नितेश राणेंना आव्हान

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि मेहेरबानीने नारायण राणे (Narayan Rane) मुख्यमंत्री झाले. त्याच शिदोरीवर नितेश राणे आमदार झाले. तोंडाचे भांडवल वगळता त्यांच्याकडे कोणतेही काम नाही. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काय दिवे लावले? कोणती कामे केली? जनतेचे कोणते प्रश्न सोडवले? सत्तेच्या माध्यमातून त्यांच्या मंत्रालयाची कोणती कामे केली? हे सांगण्याची हिंमत राणे दाखवतील काय असे आव्हान देखील मालेगावमधील हिंदू आणि मुस्लीम संघटनांनी राणे यांना दिले आहे.

महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलनात जमील क्रांती, निखिल पवार, सोहेल डालरिया, भारत पाटील, इमरान इंजिनीयर, सुशांत कुलकर्णी, इकबाल बालेमुकदम, नचिकेत कोळपकर, कलीम अब्दुल्ला, खुर्ची चमडीवाला, अंजुम इंजिनीयर, इनाम सर, इमरान रशीद यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT