Nitin Bhosle Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nitin Bhosale : ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा' म्हणणारे आता कोणाच्या पंक्तीत; निकालानंतर नितीन भोसलेंची टीका

Arvind Jadhav

Nashik News: ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ म्हणणारे विरोधी पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांचा आरोप असलेल्यांना बरोबर घेत आहेत. विकासाच्या गप्पा मारता, मग दुसरे पक्ष फोडण्याची आवश्यकता तरी काय आहे ? विधानसभा अध्यक्ष काय निकाल देणार याची महाराष्ट्राला जाणीव होती. त्यात काहीही नवीन नाही. मात्र, या कुटील राजकारणाचा बदला जनता घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नितीन भोसले यांनी केली.

निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी अजित पवार गटाच्या बाजूने आपला निकाल दिला. या निकालावर प्रतिक्रिया देताना माजी आमदार नितीन भोसले यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. अशोक चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्याचा नुकताच श्वेतपत्रिकेत समावेश करण्यात आला. त्यांनी लागलीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजप प्रवेश केला. सिंचन घोटाळ्याबाबतही तसेच झाले. मोदींनी फक्त उल्लेख केला आणि अजित पवारांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला.

सध्याचे मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) तर जवळपास अडीच वर्षे जेलमध्ये होते. जर त्यांच्यावर झालेले आरोप खोटे होते तर भुजबळ जेलमध्ये कसे राहिले? भुजबळ मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करीत आहेत. भ्रष्टाचाराचा आरोप असलेले सर्वपक्षीय नेते भाजपमध्ये आहेत. भाजपचे बोटावर मोजण्याइतपत नेते सत्तेचा उपभोग घेत आहेत. आयात झालेल्या नेत्यांना सत्तेची फळे चाखण्यासाठी देण्यात येत आहेत. या घडामोडींमुळे भाजपमध्येच मोठा असंतोष असल्याकडे नितीन भोसले यांनी लक्ष वेधले.

भ्रष्टाचार संपवण्याचा वादा करणारा भाजप आता भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्यांच्या पंक्तीत बसला आहे. मागील दहा वर्षांत भाजप सरकारने देशाची घडी विस्कटून टाकली. विकासकामांचा पत्ताच नाही. त्यामुळे १०५ आमदारांचे पाठबळ असलेल्या भाजपला फोडाफोडीची आवश्यकता भासते आहे. तीन पक्ष फोडून, त्यांची नावे व चिन्हे पळवून भाजपला मिळणारा आनंद हा असुरी स्वरूपाचा असल्याचे भोसले म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती दयनीय झाली आहे. कांदा निर्यातबंदी आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक रुपयांची मदत मिळालेली नाही. पंजाबच्या शेतकऱ्यांना चिरडण्याचे काम सुरू आहे. इंधनाच्या किमती, महागाई असा सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचा पाढा मोठा आहे. भाजप ईडी व इतर संस्थांच्या मदतीने दबाव तयार करून पक्ष वाढवण्यात मस्त आहे. मात्र, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता भाजपला धडा शिकवणारच, अशी सडेतोड टीका भोसले यांनी केली.

(Edited By - Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT