Dada Bhuse, Gulabrao Patil, Girish Mahajan & Vijaykumar Gavit
Dada Bhuse, Gulabrao Patil, Girish Mahajan & Vijaykumar Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shinde Government: लाल दिव्याची हवा डोक्यात गेल्यास विकासाचा चक्काचूर होतो!

Sampat Devgire

राहुल रनाळकर

नाशिक : एखाद्या भागात मंत्रिपद (Ministry) मिळाल्यानंतर त्या भागात जल्लोष साजरा होतो, कार्यकर्ते नवस फेडतात, मिरवणुका निघतात. यामागे फक्त एकच कारण ते म्हणजे विकास. पायाभूत सुविधांची पेरणी (Infrastructure) होऊन उद्योग येतील, उद्योगांच्या माध्यमातून रोजगार मिळेल. रोजगार मिळाल्यानंतर आर्थिक प्रगती (Economic devolopment) होईल. हे साधं आणि सरळ गणित या मागचे आहे. मात्र लाल दिव्याची हवा डोक्यात गेल्यास विकासाचा चक्काचूर होतो. उत्तर महाराष्ट्राच्या (North Maharashtra) बाबतीत आतापर्यंत तेच झाले आहे. (If ministers will not keep broad vision, then nothing will happens)

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये नाशिकसह जळगाव व नंदुरबारला कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने विकासाच्या आशा बळवल्या आहेत. आपल्या मतदारसंघापुरता विचार संकुचित ठेवल्यास विकास दूर राहील. त्याचा दूरगामी परिणाम त्या भागातील नागरिकांसह आमदारांनाही भोगावा लागेल.

सध्या राज्याच्या राजकारणात कुठल्या विभागाला मंत्रिपद व महत्त्वाचे खाते मिळते, हा चर्चेचा विषय आहे. ५० दिवसांनी का होईना शिंदे सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला. आता लवकरच खातेवाटप केले जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये नाशिकला अपेक्षेप्रमाणे एक मंत्रिपद दादा भुसे यांच्या रूपाने देण्यात आले. जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन व शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांना, तर नंदुरबार जिल्ह्याचे डॉ. विजयकुमार गावित यांना मंत्रिपद देण्यात आले. ज्या आमदारांना मंत्रिपद देण्यात आले, ते त्या-त्या भागातील मातब्बर आहेत. अनेक वर्षांपासून विजयाचा रथ त्यांच्या बंगल्याभोवतीच फिरतोय. या वेळी देखील उत्तर महाराष्ट्रात तब्बल पाच मंत्रिपदे मिळालीय, ज्यावेळी एखाद्या भागात मंत्रिपद येते, त्या वेळी त्या भागाचा विकास होईल. शासनाचे निधीची गंगा त्या भागात खळाळेल, अशी अपेक्षा असते. हीच अपेक्षा उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांची पाचही मंत्र्यांकडून राहील.

उत्तर व पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास पश्चिम महाराष्ट्राचा वेगाने विकास झाला आहे. त्या तुलनेत उत्तर महाराष्ट्राचा झालेला नाही. भाजपच्या काळात मराठवाडा व विदर्भाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. विभागनिहाय विकासाचा विचार केल्यास त्या दृष्टीने उत्तर महाराष्ट्र मागासलेला आहे. त्याला कारण म्हणजे येथील उत्तर महाराष्ट्र म्हणून जी एकी दाखवायला हवी ती दाखविली जात नाही. आता राजकारणाच्या बदलत्या वाऱ्याचा विचार करून उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी एकजूट दाखवून मोठ्या प्रमाणात निधी आणला पाहिजे. नाशिक व जळगाव हे महसुलीदृष्ट्या मोठे जिल्हे आहेत. पाणी व जमीन या उद्योगांसाठी लागणाऱ्या दोन महत्त्वाच्या बाबी दोन्ही जिल्ह्यांत आहे. नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतही अशीच परिस्थिती आहे. या जिल्ह्यांमध्ये उद्योग कसे आणता येईल, याचा विचार मंत्र्यांनी करणे गरजेचे आहे. उद्योगांसाठी निरंतर विमानसेवा गरजेची आहे.

विमानसेवा सुरू करून देश-विदेशातील उद्योजकांना उत्तर महाराष्ट्राच्या भूमीत आणता येईल. उत्तर महाराष्ट्रात रेल्वेचा विकास होणे गरजेचे आहे. देशाच्या चारही भागांना जोडणारी रेल्वेसेवा आवश्यक आहे. उत्तर महाराष्ट्रात नगदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. फुले व फळभाज्या येथील महत्त्वाचे शेती उत्पादन आहे. त्यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगांना मोठी संधी आहे. नाशिक ते जळगावच्या पट्ट्यापर्यंत अन्य प्रक्रिया उद्योगांची साखळी निर्माण झाल्यास संपूर्ण देशाला खाद्य पुरविण्याची क्षमता आहे. महामार्ग विस्तारीकरण असो किंवा उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून देणे असो या चारही मंत्र्यांनी उत्तर महाराष्ट्र म्हणून विकासाचे सूत्र अवलंबिल्यास पश्चिम महाराष्ट्र व विदर्भप्रमाणे उत्तर महाराष्ट्रालाही विकासाची नवीन दिशा मिळेल. येथील युवकांना रोजगार मिळेल. बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. या बाबींचा विचार करून आता तरी विकासाची गंगा येते येणे आवश्यक आहे.

गिरीश महाजन, दादा भुसे, डॉ. विजयकुमार गावित व गुलाबराव पाटील हे चारही मंत्री कर्तबगार आहेत. परंतु त्यांची कर्तबगारी फक्त त्यांच्या मतदारसंघापुरतीच दिसून येते. भुसे यांना कसमादे पट्टात वर्चस्व हवे असल्याने ते त्या भागाकडे अधिक लक्ष देतील. गिरीश महाजन यांना जामनेर मतदारसंघावरची पकड दिली नाही. त्यामुळेच जवळपास ३०० कोटींचा निधी त्यांनी त्या भागाकडे वळविला. जळगाव म्हणून विचार केला असता, तर आज जळगावच्या नागरिकांना खड्ड्यांचा जो त्रास होत आहे, तो झाला नसता. डॉ. विजयकुमार गावित यांनीदेखील नंदुरबारवरचे वर्चस्व कमी होऊ दिलेले नाही.

गुलाबराव पाटील यांनी मतदारसंघाच्या पलीकडे नजर फेकली नाही. एकूणच विचार करायचा झाल्यास उत्तर महाराष्ट्र म्हणून या चारही मंत्र्यांनी विचार केल्यास एकत्रित ताकद मंत्रिमंडळात दिसून येईल व त्या माध्यमातून विकासाची गंगा आणता येणे शक्य आहे. मंत्रिपद हे जादूप्रमाणे असते. कधी राहील, कधी जाईल सांगता येत नाही. उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने विकासाची मोठी संधी निर्माण झाली आहे. लाल दिवा व मतदारसंघाचा विचार झाला, तर ठीक; अन्यथा उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने पहिले ‘पाढे पंचावन्न’ ठरू नये.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT