Jalgaon News,Mahavikas Aaghadi News
Jalgaon News,Mahavikas Aaghadi News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon News : जळगावमध्ये राजकारण पेटलं; महाविकास आघाडीत ‘नॉट आलबेल’; भाजपच्या तिरक्या चालीची नवी खेळी

सरकारनामा ब्यूरो

कैलास शिंदे

Jalgaon : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील मुख्य बाजार समिती आहे. या बाजार समितीवर अगोदर भाजप-शिंदे गटाचा झेंडा होता. पण आता महाविकास आघाडीचा सभापती व उपसभापती झाला. मात्र, या निवडणुकीमुळे उफाळून आलेल्या वादानंतर आघाडीत सर्व काही ‘आलबेल’नसल्याचं समोर आलं आहे. तर महाविकास आघाडीच्या वादात भाजपने उडी घेवून आपल्या सर्व संचालकांची मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पदरात टाकले. भाजपच्या या तिरक्या चालीमुळे राजकारण्याच्या बुध्दीबळाचा नवीन पट मांडण्याची खेळी असल्याचं समोर येत आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांच्या ताब्यात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती होती. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडी विरूध्द भाजप-शिंदे गट पॅनल अशी निवडणूक झाली. यात महाविकास आघाडीच्या पॅनलला अकरा जागा मिळाल्या तर भाजप-शिंदे गटाला केवळ सहा जागा मिळाल्या एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. अपक्षानेही महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडीचे बहुमत निश्‍चित झाले होते. भाजप-शिंदे गटाकडून ही बाजार समिती निसटल्याचे स्पष्ट चित्र दिसत होते.

महाविकास आघाडीचे नेतृत्व हे माजी मंत्री गुलाबराव देवकर(Gulabrao Deokar) करत आहेत. सभापती निवडीचा मात्र मोठा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर, श्‍यामकांत सोनवणे व सुनील महाजन या पदासाठी इच्छुक होते. आघाडीतर्फे त्यांचे नाव निश्चित होईल अशी अपेक्षा होती. मात्र,अगदी शेवटच्या वेळेपर्यंत आघाडीतर्फे नावाची घोषणा झाली नाही. त्यामुळे निवडीच्या वेळेस उमेदवारीचा घोळ झाल्याचे चित्र दिसून आले.

दुसरीकडे या सर्व वादात भाजपने आपली खेळी वेगळीच केली आहे. त्यांनी सभापतीपदासाठी दाखल केलेला प्रभाकर सोनवणेंचा अर्ज मागे घेतला. त्यानंतर झालेल्या मतदानात आपल्या पक्षाच्या संचालकांची पाचही मते थेट महाविकास आघाडीचे उमेदवार श्‍यामकात सोनवणे यांना दिली. भाजपच्या या खेळीने सर्वांनाच आश्‍चर्यचा धक्का बसला आहे. बुध्दीबळाच्या पटलावरील उंटाची तिरकी चाल अचानक खेळून भाजप(BJP)ने साधलेले गणित मात्र आगामी राजकारणाच्या नव्या दिशेची चुणूक दाखवली आहे. मात्र,याचे कोडे उलगडण्यासाठी मात्र आगामी निवडणूकांची वाट पाहावी लागणार हे निश्‍चित आहे.

...आणि प्रकरण हातघाईवरही आले !

प्रत्येकाला एक वर्षे देण्याचे ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पहिल्या वर्षी आपल्यालाच पद मिळावे यासाठी श्‍यामकांत सोनवणे व लक्ष्मण पाटील यांच्यात चुरस झाली. त्यावेळी दोघांनी अर्ज दाखल करावे. त्यानंतर ठरवू व एकाने माघार घ्यावी असे ठरल्याचे आघाडीचे नेते गुलाबराव देवकर यांनी सांगितले. परंतू, अर्ज भरण्यापासूनच वाद झाला आपल्याला अर्जच भरू दिले जात नसल्याची तक्रार लक्ष्मण पाटील यांनी देवकरांकडे केली.

तर श्‍यामकांत सोनवणे यांनी सांगितले की, आपली उमेदवारी देवकरांनी निश्‍चित केल्याने आपण अर्ज भरला. मात्र हा वाद अधिकच वाढला आणि प्रकरण हातघाईवरही आले, आरोप प्रत्यारोप झाले.

आघाडीत 'नॉट आलबेल...'

दोघांची उमेवारी कायम राहिली. त्यावर मतदान झाले अन श्‍यामकांत सोनवणे विजयी झाले. लक्ष्मण पाटील व त्यांचे पुत्र संदीप पाटील यांनी मतदान केले नाही. पाटील यांनी या निवडीवर नाराजी व्यक्त केली. या निवडीनंतर गुलाबराव देवकर यांनी दोघांच्या सलोख्याचे प्रयत्न केले. लक्ष्मण पाटील यांनी सोनवणे यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रकरण मिटल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या सर्व वादात बाजार समितीत महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi)त सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT