Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

साहित्य संमेलनात राजकीय षटकार, `ईडीपिडा टळो आणि लोकशाही बलवान होवो`

Sampat Devgire

नाशिक : महात्मा फुलेंनी लिहिलेला शेतकर्‍यांचा आसूड आजही कडाडतो आहे. गेले एक वर्षे राजधानीत संघर्ष करणार्या बळिराजापुढे दिल्लीकरांना नमावे लागलेले आहे. फुले म्हणायचे इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो. आता लोक म्हणतात, ईडीपिडा टळो आणि लोकशाही बलवान होवो, असे प्रतिपादन ९४ व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री. भुजबळ बोलत होते. समारंभास गीतकार जावेद अख्तर, मराठी भाषा व उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार श्रीनिवास पाटील, नागनाथ कोतापल्ले, अ. भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, डॅा दादा गोरे, संयोजक जयप्रकाश जातेगावकर आदी उपस्थित होते. यावेळी मावळते अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो, संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणाने उपस्थित राहू शकले नाही.

श्री भुजबळ म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळात आज मी ज्येष्ठ मंत्री म्हणून सहभागी असलो तरी नाशिक आणि या परिसराने मला घडविलेले आहे. मी स्वतः लेखक नाही पण वाचक आहे. ग्रंथकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन झालेल्या ग्रंथकार सभेचे रूपांतर आज साहित्य संमेलनात झाले आहे. महाराष्ट्राचा हा महाउत्सव अखिल भारतीय पातळीवर साजरा केला जात असतो. आपण या घटनेचे साक्षीदार आहोत याचा मला आनंद वाटतो.

यावेळी त्यांनी साहित्य संमेलने, नाशिक व सामाजिक, स्वातंत्र्य आणि साहित्याच्या चळवळींचा अतिशय सविस्तर व विविध घटना, संदर्भांसह तपशील सांगितला. या संमेलनांचा राजकीय संदर्भ सांगताना ते म्हणाले, साहित्य संमेलनात राजकारण आणि संमेलन याविषयी वेळोवेळी चर्चा होत आली आहे. १९४२ च्या साहित्य संमेलनात ‘साहित्य आणि राजकारण वेगळे नाही’ याचा निर्वाळा आचार्य अत्रे यांनी दिला होता. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी १९६० सालीच साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ स्थापन करून साहित्य संवर्धन, ज्ञानसंवर्धन यांना गती दिल्याचे आपण जाणतो.

आमचे नेते शरद पवार हे स्वतः अनेक साहित्य संमेलनांना उपस्थित राहिले आहेत. आतापर्यंत चार संमेलनाचे उद्घाटन त्यांनी केले आहे. त्यांची भाषणे साहित्य मंचावर कधीच राजकीय स्वरूपाची नसतात. कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी केले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात केवळ राजकीय चर्चा केली नाही तर मराठी साहित्यातील रससिद्धांतावर त्यांनी भाष्य केले होते. साहित्य संमेलनाची आखणी करताना आपल्याला राजाश्रय हवा असतो. शासनाने तो दिला पाहिजे असेच माझे मत आहे. तुम्ही मंडळी राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन कथा, कादंबर्‍या रचत असता. वात्रटिकांसाठी राजकीय पुढार्‍याइतका मसाला तुम्हाला कोणी पुरवत नाही. तरीसुद्धा साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय नेत्याने असू नये असे काहींना वाटते, ते मला उचित वाटत नाही. तुम्ही तुमचे स्वातंत्र्य अबाधित ठेवा. ‘राज्यकर्त्यांनो तुम्ही चु्कता आहात’ हे सांगण्याचा तुमचा अधिकार आम्ही मान्य करतो.

लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन. मी एक वाचक आहे. सार्वजनिक जीवनात मी फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांनी वाटचाल करीत असतो. महात्मा फुले यांनी दुसर्‍या साहित्य संमेलनाचे निमंत्रण १८८५ साली नाकारले होते. त्यांचे म्हणणे होते की साहित्यकारांनी जातीनिर्मुलनाची भूमिका घेतली पाहिजे. त्यासाठी त्यांनी ज्योतिबांच्या कवितेचा संदर्भ दिला. या शब्दात त्यांनी हिंसेचा, रक्तपाताचा निषेध केलेला आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT