Chhagan Bhujbal, Ram Shinde, Vijay Wadettiwar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Obc Elgar Melava : राम शिंदे, वडेट्टीवार एल्गार मेळाव्याला का आले नाहीत? काय आहे कारण?

Pradeep Pendhare

Obc Melava Ahmednagar News :

नगरमधील ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा स्थानिक ओबीसी नेत्यांना बूस्टर देणारा ठरला. असे असले, तरी नगर जिल्ह्यातील भाजप आमदार प्रा. राम शिंदे आणि चंद्रपूरमधील काॅंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. या दोघांनी येणे का टाळले? याची आता जोरदार चर्चा आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढली. यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण सुरू केले. यानंतरचा ओबीसींचा नगरमधील पहिलाच एल्गार मेळावा होता. या मेळाव्याच्या नियोजनात स्थानिक ओबीसी नेत्यांनी सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून नियोजन केले. स्थानिक ओबीसी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगली वातावरण निर्मिती केली.

नगर जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये फलक उभे राहिले. या फलकांवर छगन भुजबळ यांचे छायाचित्र ओबीसींचे प्रमुख नेते म्हणून राहिले. ही फलक काही समाजकंटकांनी टार्गेट केले. फलक फाडले, काही उखडून फेकून दिले. यावर तक्रारी करत न बसता OBC नेत्यांनी संयमाने भूमिका घेत फाडलेले आणि उखडलेले फलक पुन्हा त्याच जागेवर उभे केले. यातून संपूर्ण जिल्ह्यात मेळावा यशस्वी होईल, असा संदेश दिला. चांगलं वातावरण निर्मिती होऊन मेळावा यशस्वी झाला.

मेळाव्यास्थळी प्रमुख वक्त्यांची फोटो बॅनरवर लावण्यात आले होते. यात भाजप आमदार प्रा. राम शिंदे आणि काॅंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचेही फोटो होते. हे दोन्ही नेते येणार असे सांगितले जात होते. परंतु ऐनवेळी या नेत्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. प्रा. राम शिंदे यांच्या होम ग्राऊंडवर हा मेळावा होत होता. याचवेळी त्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने स्थानिक ओबीसींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे.

सगेसोयऱ्यांची अधिसूचना निघाल्यानंतर छगन भुजबळ यांनी मुंबई येथे महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. प्रा. राम शिंदे हे भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. परंतु होम ग्राऊंडवर राम शिंदे यांनी मेळाव्यात येणे का टाळले? याची चर्चा सुरू आहे. आगामी राजकीय गणितांवर परिणाम नको म्हणून या नेत्यांनी एल्गार मेळाव्याकडे पाठ फिरल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

नगर शहरातील स्थानिक ओबीसी नेत्यांच्या नियोजनाचे छगन भुजबळांसह प्रमुख ओबीसी नेत्यांनी कौतुक केले. परंतु नगर शहरातील ओबीसी नेतेही सावध भूमिका घेऊन नियोजनात सहभागी झाले होते. स्थानिक पातळीवर जातीयतेढ नको, याची पुरेपर काळजी या स्थानिक नेत्यांनी घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाबरोबर आहेत. तसे त्यांची तालीम बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे घडलेली. भुजबळ हे मेळाव्यानिमित्ताने नगरमध्ये आल्यावर ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नगरमधील पहिले महापौर भगवान फुलसौंदर यांच्या 'जानकी' निवासस्थानी थांबले. तिथे काही काळ विश्रांती घेतली. यानिमित्ताने पूर्वीचे शिवसैनिक एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गटातील नगरमधील पदाधिकारी काहीसे सुखावले आहेत.

भुजबळ हे फुलसौंदर यांच्या निवासस्थानी तिथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दोन्ही गटासह, काॅंग्रेस, भाजप, वंचित, रासपमधील ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते. यातच मेळाव्यातील भाषणातून छगन भुजबळ यांनी नगर शहरातील शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला.

"नगरमध्ये आल्याशिवाय माझे जुने सहकारी माजी मंत्री अनिलभैय्या राठोड यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या समाजाची नगर शहरात अवघी 40 ते 50 घरे असतील. पण 25 वर्षे ते आमदार होते. लढायला लागते. रडून काहीच होत नाही", असे म्हणत भुजबळ यांनी राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला. भाजपमधील स्थानिक ओबीसी नेते सुरुवातील मेळाव्यातून व्यासपीठापासून दूर राहिले. परंतु मेळाव्यातील भाषणानंतर हे नेते व्यासपीठावर हळूच येऊन बसले.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT