Ahmednagar Political News : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या बुद्धिमतेवर मंत्री छगन भुजबळ यांनी नाव न घेता नगरमधील एल्गार मेळाव्यातून घाला घातला. "मराठा समाजातील मंत्री आणि विचारवंतांची मला कीव येत आहे. बजेटमध्ये आरक्षण देता येते का ते पाहा, असे म्हणणारा तुमचा नेता आहे", असे म्हणत भुजबळांनी मनोज जरांगेंसह मराठा नेत्यांचीही खिल्ली उडवली. दरम्यान, भुजबळांनी ओबीसींसाठी अडीच महिन्यांपूर्वीच मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याचे सांगून खळबळ उडवून दिली.
ओबीसी समाजाचा शनिवारी नगरमध्ये एल्गार मेळावा झाला. यावेळी भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, "मराठा समाजातील मंत्री व विचारवंतांची मला कीव येते. बजेटमध्ये आरक्षण देता येते का ते पहा, असे म्हणणारा तुमचा नेत्यांविरुद्ध कोणी काही बोलत नाही. त्याच्यामुळे गावा-गावात दरी निर्माण झाली आहे. मराठ्यांना आरक्षण स्वतंत्र द्या, ओबीसीतून देऊ नका एवढेच आमचे म्हणणे आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मराठा विचारवंताना उद्देशून भुजबळ म्हणाले, तुमचे ते नेते आता मंडल आयोगाला आव्हान देणार आहेत. त्याच मंडल आयोगाने ओबीसी आणि कुणबींना आरक्षण दिले आहे. तो आयोग संपला तर आता तुम्ही कुणबी होऊन काय उपयोग?, असा सवालही त्यांनी केला.
मराठा समाजाच्या मंत्र्यांचाही भुजबळांनी समाचार घेतला. इकडे उपोषण, तिकडे जीआर. मराठा समाजाच्या मागण्याबाबत फटाफट जीआर निघत आहे. यातून समाजामध्ये संभ्रम तयार झाला आहे. निधी वितरीत होतो, मात्र ओबीसींच्या मागण्या पुढे आल्या तर कॅबिनेट पुढे ठेवावे लागते. पैसा आहे की नाही, ते पाहावे लागेल, अशी उत्तरे दिली जातात, असे म्हणत भुजबळांनी मराठा मंत्र्यांना नाव न घेता फटकारले. ओबीसींच्या सवलती मराठा समाजालाही देण्याचा निर्णय झाला आहे. मग ब्राह्मण, लिंगायत, जैन यांनाही द्यायला काय हरकत आहे, असेही भुजबळ म्हणाले.
मराठा सर्वेक्षणात सर्वांचे आधार नंबर घेतलेले आहेत. त्या आधारे तपासणी करून खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी घ्यावा, असे आवाहन आमदार प्रकाश शेंडगे यांनी केले. ओबीसींनी याच निवडणुकीत राग काढावा आणि इंगा दाखवावा, असा इशारा महादेव जानकरांनी दिला.
2024 मध्ये भुजबळांच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा झेंडा फडकवू व ओबीसी मुख्यमंत्री झाल्यावर यांना त्यांची लायकी दाखवून देऊ, असे कल्याण दळे म्हणाले. माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण गायकवाड, शब्बीर अन्सारी, पी. टी. चव्हाण, दौलत शितोळे, सत्संग मुंढे, लक्ष्मण हाके यांची मेळाव्यात भाषणे झाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मग बसा एकमेकांची भादरत...
परभणी जिल्ह्यातील मानवत येथे विजय मिरवणूक चालू असताना घरात घुसून महिलांना मारहाण करण्यात आली. ओबीसी मोर्चा सहभागी झाले म्हणून हा प्रकार झाला. एका नाभिक समाजाच्या व्यक्तीने माझे समर्थन करणारी पोस्ट समाज माध्यमांवर टाकली तर त्याच्यावर गावातील मराठ्यांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे मी नाभिक समाजाला आवाहन करतो की, एकाही मराठ्याची हजामत करू नका. त्यांना आपसातच एकमेकाची भादरु द्या, असा घणाघातही भुजबळांनी केला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.