District Government Hospital Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar District Government Hospital: शिवसेना पदाधिकार्‍यांचा नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना 'डोस'

Nagar Shivsena : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी नगर जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे यांच्याशी संवाद साधला.

Ganesh Thombare

Ahmednagar News: खासगी रुग्णालयातील उपचार सर्वसमान्यांच्या खिशाला परवडत नाहीत. यात सर्वसामान्य गोरगरिबांना आधार उरतो तो, शासकीय जिल्हा रुग्णालयाचा. परंतु गेल्या काही दिवसांत राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेत.

नांदेड, नागपूर, ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत झालेल्या मृत्युतांडवाने सर्वसामान्यांचा थरकाप उडवला आहे. राज्य सरकारी आरोग्य व्यवस्था बेभरवशाची झाली आहे, असा संदेश सर्वसामान्यांमध्ये गेला आहे.

या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील व्यवस्थेची शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी आज पाहणी करत जिल्हा शल्यचिकीत्सकांना रुग्णांप्रती दक्ष राहण्याचा 'डोस' दिला. शिवसेनेच्या दिलेल्या या 'डोस'ची सत्ताधारी आणि आरोग्य व्यवस्था कशी दखल घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी आज नगर जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे यांच्याशी संवाद साधला. 'रुग्णांच्या प्रमाणात खाटांची संख्या कमी असून, आरोग्य कर्मचारी देखील कमी आहेत.

तसेच नवीन 500 बेडचा प्रस्ताव आणि स्टाफची संख्या वाढविण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवला आहे', अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना दिली.

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी नगर जिल्हा रुग्णालयातील गाफील व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आगीची मोठी दुर्घटना पूर्वी घडलेली आहे. यात 15 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. यानंतर देखील रुग्णालयातील कामकाजात सुसूत्रता आलेली नाही, असे निरीक्षण यावेळी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी नोंदवले.

नगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पाहणीत अनेक त्रुटी आढळल्या आहे. एकप्रकारे जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थापनच 'ऑक्सिजन'वर आहे. कारभारात सुधारणा नाही. जिल्हा रुग्णालयात कोणताही अनुचित प्रकार झाल्यास शिवसेनेच्या स्टाईलमध्ये 'डोस' देऊ', असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिला.

नगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या विविध वार्डमध्ये असलेल्या वैद्यकीय उपकरणे कार्यरत नसल्याचे समोर आले. औषधांचा आणि ऑक्सिजनचा साठा याची देखील तपासणी पदाधिकार्‍यांनी केली. बाल रुग्णालयासह इतर विभागातील अस्वस्छता यावेळी आढळून आली.

राज्याच्या आरोग्य व्यवस्थेकडे आरोग्य मंत्र्यांचे दुर्लक्ष असल्याचा निषेध यावेळी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केला. दरम्यान, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, नगरसेवक दत्ता कावरे, योगीराज गाडे, प्रशांत गायकवाड,दत्ता जाधव, सचिन शिंदे, प्रशांत पाटील, अंबादास शिंदे उपस्थित होते.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT