मालेगाव : नाशिक (Nashik) जिल्ह्यात यावर्षी विक्रमी उन्हाळी कांदा लागवड करण्यात आला आहे. पाण्याची उपलब्धतता असल्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न येण्याची शक्यता आहे. निर्यात वाढल्यास भाव टिकून राहतील. निर्यातीला चालना देण्यासाठी आपल्या माध्यमातून केंद्र शासनाकडे (Centre Government) पाठपुरावा करण्याचे साकडे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना मालेगाव बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव व शिष्टमंडळाने घातले. कांद्याची निर्यात वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन श्री. पवार यांनी या वेळी दिले.
सभापती राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी कांदा व डाळींब पिकाबाबत माहिती जाणून घेतली. गेल्या तीन वर्षापासून कसमादेसह नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस होत आहे. वर्षापासून कांद्याचे भाव टिकून आहेत. पाण्याची उपलब्धता असल्यामुळे यावर्षी नाशिक जिल्ह्यात विक्रमी उन्हाळी कांदा लागवड करण्यात आला आहे.
निर्यात वाढली तरच भाव टिकून राहतील. निर्यात कमी झाली तर भाव कोसळण्याची भीती आहे. निर्यात वाढीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे साकडे पवार यांना घालण्यात आले. कांदा निर्यात वाढीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. श्री. पवार यांनी मालेगावातील यंत्रमाग, फळशेती याबाबत सभापती जाधव यांच्याकडून माहिती जाणून घेतली. या वेळी रमेश मोरे, विलास सोनजे आदी उपस्थित होते.
कसमादेत कांद्याचे बंपर पीक
गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यावर्षी रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. भाव टिकून असल्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारीक गहू, हरभरा या रब्बी पिकाऐवजी उन्हाळी कांद्याला पसंती दिली आहे. नोव्हेंबरपासून कांदा लागवड सुरु झाली. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उन्हाळी कांदा लागवड होत होती. सध्या पीक जोमात आहे. विहिरींना अजूनही पुरेसे पाणी आहे. हरणबारी, चणकापूर, पुनंद या धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आवर्तन मिळणार आहे. निसर्गाने साथ दिल्यास यंदा उन्हाळी कांद्याचे बंपर पीक येणार आहे. उत्पादन वाढल्यास भाव टिकून राहतील की नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनात साशंकता आहे. सभापती राजेंद्र जाधव यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कांदा निर्यातीसंदर्भात साकडे घातल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.