Ahilyanagar politics news : भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या अहिल्यानगरमधील "ऑपरेशन लोटस"नं वेग घेतला. श्रीरामपूर इथं दीपावली स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात स्थानिक नेत्यांचा पक्ष प्रवेश घडवून, विरोधकांना धक्का दिला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील स्थानिक नेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची बहीण माजी नगराध्यक्ष इंदूमती डावखर यांच्यासह इतर महत्त्वाच्या स्थानिक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला.
मंत्री विखे पाटील यांनी, यावेळी संगमनेरचा संदर्भ देत, 'आज मिसळ संगमनेरची आणि पाव लोणीचे आहे,' अशी चपखल टिप्पणी केली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केलेल्या या टिप्पणीमुळे एकच हशा पिकला.
दीपावली स्नेहमिलनाच्या औचित्याने श्रीरामपूरात (Shrirampur) हिंदी–मराठी गाण्यांची मैफल रंगली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या ओघवत्या आणि मिश्कील शैलीत संगमनेरचा संदर्भ देत वातावरण रंगवले. अशोक बँकेचे माजी अध्यक्ष नारायणराव डावखर, माजी नगराध्यक्षा इंदूमती डावखर, गजेंद्र डावखर, रवी गुलाटी, हेमा गुलाटी, राजेश अलघ यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल, असे मानले जाते.
मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe) म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद निर्माण करणं हेच नतद्रष्टपणाचं लक्षण होतं. मात्र महायुती सरकार आल्यावर चार दशकांचे स्वप्न साकार झाले. आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही भव्य स्मारक उभे राहणार आहे."
'भाजपमध्ये पक्ष संघटनेला महत्त्व आहे. प्रत्येक कार्यकर्ता पक्षाच्या पाठीशी असल्यामुळेच संघटना मजबूत आहे. व्यक्ती नाही, संघटना मोठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाचे नवे पर्व सुरू आहे,' असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.
“नाॅर्दन ब्रँच कालव्याचे नुतनीकरण सुरू झाले आहे. येत्या सहा महिन्यांत विकास प्रक्रियेच्या माध्यमातून श्रीरामपूरचा चेहरामोहरा बदलेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला विविध मंडळांचे पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंदुमती डावखर या माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या भगिनी आहेत. तर त्यांना काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार जयंत ससाणे यांनी नगराध्यक्षपदाची संधी दिली होती. भानुदास मुरकुटे हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.