Mahayuti rebellion : महायुतीत बंडखोरीचे वारे? नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीनं नेत्यांची डोकेदुखी वाढवली
Ahilyanagar Nagarparishad election : नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी ठरताना दिसतोय.
सत्ताधारी महायुतीत बंडखोरी रोखण्याचं आव्हान असताना, कशी एकसंघ राहिल, यावर भर द्यावा लागणार आहे. तुलनेत महाविकास आघाडीत कुठेतरी एकसंघ दिसत असला, तरी अस्तित्वासाठी जिथं निर्णय घ्यायचा आहे, तिथं निर्णय घेण्यासाठी नेत्यांची दमछाक होताना दिसते आहे.
संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर (Shrirampur), देवळालीप्रवरा, पाथर्डी, राहुरी, जामखेड, शेवगाव, श्रीगोंदा इथल्या नगरपरिषदेसाठी आणि नेवाशातील नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांमध्ये अनेकांना संधीची स्वप्न पडू लागली आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. या दोन्हींमधील मित्रपक्षांमध्ये इच्छुक स्थानिक नेत्यांच्या फौजा-फौजा मैदानात आहेत. त्यामुळे बंडखोरीचे वारे वाहू लागले आहे.
थोरातांना खताळांचे पुन्हा आव्हान
संगमनेरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांनी तिथं आमदार खताळ यांना बळ दिल्याने यावेळी तिथं नेमकं काय परिस्थिती असेल, महायुतीचा उमेदवार कोण असेल, याची चर्चा आहे. कोपरगावमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आशुतोष काळे आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या डावपेच रंगण्याची शक्यता आहे. एकप्रकारे महायुतीत इथं लढाई होण्याची चिन्हं आहेत.
विखे पाटलांविरुद्ध सगळे
राहाता आणि शिर्डी इथं भाजप मंत्री राधाकृष्ण विखे एकहाती सत्ता खेचून आणू शकतात. ही प्रथा या निवडणुकीत देखील कायम राहील. तिथं काँग्रेसला बाळासाहेब थोरात किती बळ देतात, तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि विखे यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी राजेंद्र पिपाडा काय भूमिका घेतात, याकडे लक्ष असेल. शिर्डीत तर विखे पाटील यांच्याविरोधात सगळे, असे चित्र आहे. राहाता आणि शिर्डीत महायुतीमधील बंडखोराला अधिक बळ मिळू शकते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
भाजप-शिवसेनेत संघर्ष
श्रीरामपूरमध्ये महायुतीत दिग्गज नेते आहेत. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार भानुदास मुरकुटे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, माजी आमदार लहू कानडे एवढी मोठी फौज आहे. पण सध्या जिल्ह्यात श्रीरामपूर राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदु ठरलं आहे. संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी जे प्रयोग झाले, तेच प्रयोग श्रीरामपूरमध्ये विखे पाटील पिता-पुत्र करताना दिसत आहेत. असे असले तरी तिथं सर्वाधिक बंडखोरीची शक्यता आहे. विखे पाटील पिता-पुत्र नेमकी काय भूमिका घेतात, कोणती राजकीय गुगली टाकतात, याचे चित्र 17 नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट होईल.
काँग्रेसची भूमिका काय असणार
श्रीरामपूर इथं काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांच्यामुळे करण ससाणे यांना बळ मिळालं आहे. पण महाविकास आघाडीत काँग्रेस आणि बाळासाहेब थोरात कोणत्या भूमिकेत राहणार, याकडे लक्ष असणार आहे. भाजपमधून नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले प्रकाश चित्ते यांनी नगराध्यक्षपदाचा शब्दच घेऊन आले आहेत. याशिवाय अनुराधा आदिक यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. यातून महायुतीत बंडखोरीची सर्वाधिक चर्चा आहे.
भाजपविरुद्ध तनपुरे
राहुरीमधील देवळी प्रवरामध्ये भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे वर्चस्व राहिलं आहे. राहुरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा दबदबा राहिला आहे. परंतु तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांचे काका अरुण तनपुरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पॅनला पराभूत करत यश मिळवलं, यानंतर अरुण तनपुरे यांनी अजित पवार यांच्या उपस्थित शेतकरी मेळावा घेतला.
भाजपला कर्डिलेंची उणिव
तनपुरे कुटुंबियांना शरद पवारांपाठोपाठ अजितदादांचं बळ मिळणार अशी चर्चा होती. तनपुरे या निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घेत, याकडे लक्ष असेल. राहुरीत एकहाती लक्ष घालणारे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन झाले आहे. ही पोकळी भाजपला सतावते. ती भरून काढण्यासाठी विखे पाटील पिता-पुत्र काय भूमिका घेतात, याकडे लक्ष असणार आहे.
राजळेंविरुद्ध नाराज पदाधिकारी
पाथर्डी भाजप आमदार मोनिक राजळे कणखरपणे त्यांचा बालेकिल्ला संभाळत असल्या, तरी ग्राऊंड पातळीवर भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी वेगळी भूमिका घेतली होती. त्यामुळे आमदार राजळे यांची भूमिका निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बाजूने जाणार असल्याने, पुन्हा पदाधिकाऱ्यांबरोबर संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शिलेदार प्रताप ढाकणे संभ्रमावस्थेत आहेत. त्यांच्या कारखान्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्ज मंजूर करत, बळ दिलं आहे. यासाठी त्यांच्या मुंबईत बैठका झाल्या आहेत. निवडणुकीत अलिप्त राहून समर्थकांना पुत्रामार्फत बळ देण्याची रास्ता ते घेण्याची कुजबूज, पाथर्डीत आहे.
महायुतीविरुद्ध महायुती
श्रीगोंद्यात महायुतीत संघर्ष उफाळणार आहे. भाजप आमदार विक्रम पाचपुते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील नेत्यांमध्ये राजकीय संघर्षाची चिन्हं आहेत. स्थानिक पातळीवर भाजपचा वरचष्मा आहे. यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दिग्गज नेत्यांची फौज असल्याने आपापल्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्याच्या नादात बंडखोरीची सर्वाधिक चर्चा आहे. त्यामुळे भाजपचा महायुतीत असून देखील एकला चलोची भूमिका घेऊन मिशन फत्ते करण्याच्या तयारीत आहे.
पवार-शिंदे यांच्यात लढाई
जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजप विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष राज्याच्या पातळीवर गाजत आहे. विधानपरिषदेत संधी मिळताच, प्रा. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडमधील आमदार पवार यांना अनेक संस्थांमध्ये धक्का देत, राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं. आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांच्या ताब्यात असलेल्या जवळपास सात ते आठ संस्था प्रा. राम शिंदे यांच्या समर्थकांनी पुन्हा ताब्यात घेत सत्ता प्रस्थापित केली आहे.
गडाखविरुद्ध महायुती
नेवासा इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी मंत्री शंकरराव गडाख आणि महायुती, असा सामना रंगणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे असेल, तरी सर्वाधिकार भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असणार आहेत. त्यामुळे तिथं महायुतीमधून नगराध्यक्षपदाचा चेहरा कोण असेल, याची उत्सुकता आहे. एकप्रकारे शंकरराव गडाखांविरुद्ध महायुती असा संघर्ष नेवाशात पाहायला मिळेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

