Shirdi MP Bhausaheb Wakchaure statement : राज्यात विधान परिषद निवडणुकीचा राजकीय धुरळा उडालेला असतानाच, नाशिकच्या राजकारणातून पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कथित संपर्कांमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, ठाकरे गटाचे तब्बल सात खासदार, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा होत असताना शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या वक्तव्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’ हा महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. शिवसेना ठाकरे पक्षातील काही खासदार आणि आमदार भविष्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचीही चर्चा रंगली होती. त्यातच शिंदे यांच्या वारंवार दिल्ली दौऱ्यांमुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले.
या सर्व घडामोडींवर शिवसेना (ShivsenaUBT) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी तसेच स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘ऑपरेशन टायगर’चे खंडन केले आहे. मात्र, आता खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे हा विषय पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
‘ऑपरेशन टायगर’बाबत विचारले असता वाकचौरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, मला या विषयाची कोणतीही माहिती नाही. मी एकनाथ शिंदे यांना भेटलेलो नाही. कोणते खासदार भेटले, याचीही मला कल्पना नाही. त्यामुळे मला यावर काही बोलायचे नाही.
मात्र त्यानंतर त्यांनी केलेले वक्तव्य राजकीय चर्चांचा विषय ठरत आहे. मतदारसंघाच्या कामासाठी एखाद्या मंत्र्याला भेटलो म्हणजे लगेच पक्ष सोडणार, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. मला त्या पक्षात ढकलायच्या विचारात आहात का? माध्यमांना हात जोडून विनंती करतो, यावर जास्त प्रश्न विचारू नका, असे सांगताना त्यांनी ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ असे सूचक विधान केले. त्यामुळे त्यांनी चर्चांचे खंडन केले की संकेत दिला, यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या मेळाव्याला वाकचौरे अनुपस्थित राहिल्यानेही अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्यावर टीकाही केली होती.
याबाबत स्पष्टीकरण देताना वाकचौरे म्हणाले, चंद्रकांत खैरे माझ्याबद्दल काय बोलले, हे त्यांनाच विचारा. शिर्डीतील मेळाव्याच्या वेळी मी संसदीय समितीसोबत पंजाबमध्ये अभ्यास दौऱ्यावर होतो. त्यामुळे मेळाव्याला उपस्थित राहू शकलो नाही.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या चर्चांमुळे ‘ऑपरेशन टायगर’चा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आला असून, शिवसेना ठाकरे पक्षातील नेमके किती नेते एकनाथ शिंदे शिवसेनेच्या संपर्कात आहेत, याबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.