Dr Bharti Pawar, Centre Minister
Dr Bharti Pawar, Centre Minister Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आमचे स्वकीय, विरोधकांनी राजकीय नैतिकता गुंडाळून ठेवली?

Sampat Devgire

नाशिक : काही स्वकीय आमचे दैवत (स्व.) ए. टी. पवार उर्फ दादासाहेब यांचे नाव घेऊन राजकारण करीत आहेत. परंतु त्याच दादासाहेबांना २०१४ साली पराभव पत्करावा लागला. ज्यांच्यामुळे पराभव झाला, आज आमचे स्वकीय त्यांच्याच मांडीला मांडी लावून राजकारण करत आहेत, हि कुठली नैतिकता? असा प्रश्न केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार (Dr Bharti Pawar) यांनी उपस्थित केला आहे.

भाजपच्या डॅा. भारती पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार हे दोघेही स्व. ए. टी. पवार यांचा राजकीय वारसा सांगतात. त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कळवण नगरपंचायतीत राष्ट्रवादीला कौल मिळाला. त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. हा वाद अद्याप शमलेला नाही, हे केंद्रीय राज्यमंत्री पवार यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे.

त्या म्हणाल्या, राज्यासह नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये भाजपाने घवघवीत यश मिळवले आहे. तीस नगरसेवक निवडून येऊन भाजपा जिल्ह्यात नंबर वन ठरला आहे. असे असतानाही केंद्रीय मंत्र्यांना धक्का अशा बातम्या विरोधकांकडून हेतु पुरस्कर पसरवल्या जात आहेत.

वास्तविक पाहता कळवण नगरपरिषदेत भाजपचे तीन नगरसेवक होते. आता ही संख्या दोन झाली. सत्ताधारी पक्षाचे पूर्वी आठ नगरसेवक होते. ते आता नऊ झाले. परंतु विरोधक प्रसिद्धी माध्यमांतून असा आव आणत आहेत जणूकाही त्यांचे १७ पैकी १७ निवडून आले. भाजपला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे एक जागा कमी झाल्याने एवढा मोठा धक्का म्हणने याचे मला आश्चर्य वाटते.

त्या पुढे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद असो वा अन्य निवडणूका स्वकीयांशी संघर्ष करत पक्ष बदल करून भारतीय जनता पक्षाने मोठ्या उमेदीने एक सामान्य महिलेला जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी भाजपचे मनापासून आभार मानते. काही स्वकीय आमचे दैवत (स्व.) ए. टी. पवार उर्फ दादासाहेब यांचे नाव घेऊन राजकारण करत आहेत, परंतु त्याच दादासाहेबांना २०१४ साली ज्यांच्यामुळे पराभव पत्करावा लागला आज ते त्यांच्याच मांडीला मांडी लावून राजकारण करत आहेत हि कुठली नैतिकता?

वास्तविक पाहता कळवण विधानसभेत कळवण नगर परिषद व सुरगाणा नगर परिषदेत निवडणूक झाल्या. परंतु सुरगाणा नगर परिषदेत राज्यात सत्ता असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला केवळ एक जागा मिळाली ह्याबद्दल त्यांना धक्का लागला नाही का? माझ्या लोकसभा मतदार संघात दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा, निफाड येथे नगरपरिषदेचे निवडणुका झाल्या. नगरपरिषद निवडणुका काळात दिल्ली येथे हिवाळी अधिवेशन सुरू होते. कोरोनाचे संकट असताना आणि त्यावर नियोजन करण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरू होते. याही परिस्थितीत नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतल्या मतदारांनी भाजपावर पुन्हा विश्वास दाखवला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती व सत्तेचा गैरवापर झाला. नाशिक जिल्ह्यात विरोधात वजनदार नेते असताना देखील भाजपचे जास्त उमेदवार निवडून आले. त्याबद्दल काही प्रसारमाध्यमे काहीच बोलत नाही याचे खरच आश्चर्य वाटते?श्री. फडणवीस आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नगरपंचायतींना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. यापुढेही केंद्र सरकारच्या माध्यमातून विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहिल. जनतेने दिलेला कौल हा आम्हाला मान्य असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन, जनतेचे आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळाच्या जोरावर यापुढे कितीही अडचणी आल्या तरी आम्ही सामान्य जनतेचे निस्वार्थपणे काम करत राहू.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT