NCP workers and social activists protest Over Postmortem Money Demand sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Postmortem Money Demand : धक्कादायक! शवविच्छेदनासाठी ‘पाच हजार’ मागितले? ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादीचा ठिय्या

NCP workers and social activists staged major protest Parner after allegations money demand for postmortem procedures rural hospital surfaced : आत्महत्याग्रस्त तरुणाच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीवेळी ‘मेडिकल किट’, कर्मचारी आणि वाहनखर्चाच्या नावाखाली पैशांची मागणी झाल्याचा आरोप शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करत आंदोलन केलं.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतांच्या नातेवाईकांकडून पैशांची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप समोर आल्यानंतर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन छेडले. आत्महत्या केलेल्या एका तरुणाच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप करत संतप्त तरुणांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पारनेर (Parner) शहरातील एका तरुणाने आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र रात्री शवविच्छेदन करता येणार नसल्याचे सांगत प्रशासनाकडून विलंब केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरवातीला पोलिस (Police) प्रशासनाचे पत्र आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संबंधित कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता शवविच्छेदनासाठी आवश्यक मेडिकल किट नसल्याचे सांगून प्रक्रिया लांबवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी कर्मचारी बोलावण्यासाठी वाहनखर्च आणि इतर कारणांसाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मेडिकल किटच्या नावाखाली तब्बल पाच हजार रुपयांची मागणी झाल्याचा दावा करण्यात आल्याने उपस्थित तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली.

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे यांनी या प्रकारामागे ग्रामीण रुग्णालयातील कथित रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप केला. मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखाचा गैरफायदा घेत आर्थिक लूट सुरू आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, नगरसेवक योगेश मते, डॉ. सचिन औटी, भूषण शेलार, सुभाष शिंदे, राजू शेख, विजय भास्कर औटी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष वैभव औटी सहभागी झाले होते.

आंदोलनाची माहिती मिळताच खासदार नीलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. मृतांच्या नातेवाईकांवर अशा प्रकारे आर्थिक अन्याय होणे अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

आंदोलनकर्त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश लोंढे यांनी स्वतः रुग्णालयात येऊन चर्चा करावी, अशी मागणी केली होती. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक असल्याने आपण पारनेरला येऊ शकत नसल्याचे त्यांनी फोनवरून सांगितले. तसेच संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनही दिले.

मात्र डॉ. लोंढे प्रत्यक्ष रुग्णालयात न आल्याने आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करत गांधीगिरी आंदोलन केले. प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले, तरी दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT