Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सत्तेत असताना ५ वर्षे तुम्ही झोपला होता का?

Sampat Devgire

मुंबई : ओबीसी समाज (OBC) तुमच्या खांद्याला खांदा लाऊन समाजात पुढे आला तर ते तुम्हाला नको आहे. हीच खरी तुमच्या पोटातली मळमळ आहे. आज आरक्षणावर आक्रोश करीत आहात, सत्तेत असताना पाच वर्षे (BJP) तुम्ही झोपला होता का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. (Sharad Pawar clears, no elections without OBC reservation)

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलतर्फे आज मुंबईत राज्यव्यापी परिषद झाली. या परिषदेत श्री. पवार बोलत होते. यावेळी राज्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी देशात ओबीसींची जनिहाय जनगणना करावी यांसह विविध ठराव करण्यात आले.

यावेळी श्री. पवार म्हणाले, या ठरावांतून प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकारला एक मार्ग मिळेल. आज समाजात समतेचे वातावरण राहिलेले नाही. ओबीसी समाज एकसंघ करायचा असेल तर, त्याला मदतीचा हात म्हणून आपण आरक्षणाची मागणी करतो आहे. राज्यात समाजासाठी आयुष्य वेचलेली काही मोठी माणसे होऊन गेली. त्यात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मार्ग दाखवला.

राजश्री शाहू हे राजे होते. त्यांनी मागास घटकांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्याकडे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर त्यांनी फारशी प्रतिक्रीया न देता सगळ्यांना दुसऱ्या दिवशी बोलावले. त्यांच्या घोडदळातील बलदंड घोडे आणले. आणि एक टांग्याचा घोडा आणला. त्यांच्या पुढे खाद्य ठेवले. या दोन्ही घोडयांना जेव्हा खाण्यासाठीसोडले, तेव्हा लठ्ठ, मजबूत घोडे धावत गेले व त्यांनी सर्व खाऊन टाकले. जो टांग्याचा घोडा होता, तो तीथे पोहोचेपर्यंत सर्व संपले होते. तेव्हा त्यांनी आरक्षणाचे महत्व दाखवून दिले.

श्री. पवार म्हणाले, जोपर्यंत ओबीसी व अन्य मागास घटकांना दिलेल्या आरक्षण व अधिकारांचा लाभ होत नाही, तोपर्यंत त्यांच्या सवलती सुरु ठेवाव्या लागतील. त्यासाठी ओबीसींची नक्की लोकसंख्या किती व त्यांना मिळणारा वाटा किती हे समजून घ्यावे लागेल. त्यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना आवश्यक आहे. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी देखील भाजपला स्पष्ट सांगून टाकले आहे की, तुमची निती आम्हाला मान्य नाही, ओबीसी जनगणना झाली पाहिजे. मात्र सत्तेत जी मंडळी बसली आहे, ते ही जनगणना होऊ देतील असे वाटत नाही. त्यामुळे आपल्याला एकत्र यावे लागेल. प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घ्यावी लागेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी नुकतेच एक विधान केले आहे. त्यांना ओबीसी समाजाची जनगणना मंजूर नाही. तशी जनगणना झाली तर सामाजिक एकतेवर प्रहार होईल. वातावरण बिघडेल. ते परवडणारे नाही, असे ते म्हणाले. हे त्यांचे खरे धोरण आहे. आज ते रस्त्यावर उतरून मागणी करत आहेत. पाच वर्षे सत्तेत होते, तेव्हा ही मंडळी झोपली होती का? असा प्रश्न त्यांनी केला.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT