BJP Vs NCP News: पिंपळगाव बसवंत नगरपालिकेची पहिली निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. यानिमित्ताने भाजपने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाशी युती केली आहे. त्यामुळे या युतीला काय प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता आहे.
महाराष्ट्राच्या द्राक्ष निर्यातदारांची पंढरी म्हणजे पिंपळगाव बसवंत. येथील निवडणुकीत भाजपने एकनाथ शिंदे यांच्याशी सख्य करून पॅनल केला आहे. डॉ.मनोज बर्डे यांना थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. या पॅनलची लढत प्रस्थापित बनकर कुटुंबीयांशी आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात फिरवीत उमेदवारांना "सर्व काही" मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेला बळ मिळाले.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार दिलीप बनकर यांनी मोठा डाव टाकला आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते भास्कर बनकर यांना त्यांनी आपल्या गटात घेतले. त्यामुळे भास्कर बनकर, आमदार बनकर आणि तानाजी बनकर यांसह ‘नाना- काकांची’ जोडी या निमित्ताने एकत्र आली आहे.
पिंपळगाव बसवंतची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने सर्व बळ पणाला लावले आहे. जलसंपदा मंत्री महाजन यांनी हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणाच करून टाकली. त्यामुळे भाजपला प्रचारासाठी नवा मुद्दा आणि हुरूप आला आहे.
जलसंपदा मंत्री महाजन यांनी दत्तक घेण्याची घोषणा सहज केलेली नाही. त्यासाठी त्यांनी अटही टाकली आहे. या गावाला नगरपालिकेची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे, असे सांगितले.
आता हे गाव मी दत्तक घेत आहे. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. नगरपालिकेतही सर्वच्या सर्व जागा भाजपला मिळाल्यास शहराच्या विकासासाठी हवा तेवढा निधी देऊ. आपल्या मताचे नगरसेवक त्यासाठी निवडून आले पाहिजे, अशी अट त्यांनी कार्यकर्त्यांना टाकली आहे.
पिंपळगाव बसवंत शहरात सर्व बनकर एकत्र आले आहेत. गेल्या ७० वर्षात किमान ६० वर्ष या गावात बनकर कुटुंबीयांवर मतदारांनी विश्वास व्यक्त करीत सत्ता दिली. भास्करराव बनकर यांचा संपर्क, कामाचा झपाटा आणि कल्पकता या जोरावर त्यांनी सत्ता ताब्यात ठेवली होती.
यंदाच्या निवडणुकीत आमदार दिलीप बनकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने सत्तेच्या माध्यमातून आमदार बनकर यांना मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यात प्रस्थापित बनकर विरुद्ध भाजप असे चित्र रंगविण्यात आले आहे. गावात बनकर यांना स्पर्धा ठरतील असे मोरे कुटुंबीय देखील या निमित्ताने एकत्र आले आहेत. ते काय भूमिका घेता यावर बरेच काही अवलंबून आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.