Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

PM Modi Shirdi Visit: मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनात निरुत्साह; मंत्री विखेंनी भर बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांना झापले

Ganesh Thombare

महेश माळवे :

Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 26 ऑक्टोबरच्या दौऱ्याचे नियोजन शिगेला पोहचले आहे. महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे स्वतः नियोजनात लक्ष घालून नगर जिल्हा पिंजून काढत आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीर मंत्री विखे यांनी श्रीरामपूरमधील भाजपमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. नियोजनात आढळलेल्या उणिवांवर मंत्री विखे यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्ताने श्रीरामपूर येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. भाजपचे नगर उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे, माजी नगरसेवक जितेंद्र छाजेड उपस्थित होते.

मंत्री विखे यांनी सुरवातीपासून पदाधिकारी व कार्यकर्ते यांना फैलावर घेतले. श्रीरामपुरात पक्ष म्हणून भाजपचे काही अस्तित्व आहे की नाही. येथे संघटना ही नावालाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असतानाही सर्वत्र शुकशुकाट कसा, असा सवाल केला.

जलजीवन मिशनसारख्या केंद्राच्या अनेक योजनातून गावोगावी केंद्राकडून कोट्यवधींचा निधी मिळाला. मात्र, त्याचा साधा फलक लावून पंतप्रधानांचे धन्यवाद मानावे, असेही कोणाला वाटले नाही. पंतप्रधानांचा दोन दिवसावर दौरा आलेला असताना काय नियोजन केले, अशी थेट विचारणा मंत्री विखे यांनी केली.

मंत्री विखेंचा आक्रमकपणा पाहिल्यावर पदाधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती. नगर उत्तर जिल्हाध्यक्ष लंघे यांना पक्ष कार्यकर्त्यांसाठी आगामी काळात आचारसंहिता तयार करण्याची सूचना मंत्री विखे यांनी केली. यापूर्वी कार्यकर्ता सकाळी भाजपमध्ये, तर रात्री कॉग्रेसमध्ये दिसायचा. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. इतके दिवस पक्ष संघटनेकडे लक्ष दिले नाही. आता पूर्ण ताकदीने लक्ष घालणार असल्याचे मंत्री विखे यांनी या बैठकीत सांगितले.

नगर जिल्हा विभाजनाच्या वावड्या

नगर जिल्हा विभाजनाचा विषयाला हात घालत विभाजनाच्या केवळ वावड्या उठविल्या जात आहेत. त्याकडे सध्या लक्ष देणे गरजेचे नाही, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. पंतप्रधानाच्या दौऱ्याचे व्यवस्थित नियोजन करावे. मालधक्क्याबाबत पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बैठक घेवू. कोणालाही विस्थापित होवू देणार नाही, असे स्पष्ट करून प्रत्येक गावात पक्षाचे नेते, कार्यकर्ते आहेत. आपापाल्या गावात स्वतःचे फलक लावावेत, जेणेकरून लोकांनाही कळेल भाजपमध्ये कोणकोण आहेत,असे मंत्री विखे यांनी सुचविले.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT