मालेगाव : त्रिपुरातील घटनेचे पडसाद म्हणून शुक्रवारी जमलेला जमाव, दगडफेक व दंगलीचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. याबाबत पाच गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये व्हायरल झालेला व्हिडीओ आणि `कुत्ता गोली`ची नशा करणारे टवाळखोर जबाबदार असल्याची शक्यता चर्चेत आहे. याबाबत पोलिस त्यातील कनेक्शन शोधत आहेत.
काही समाजकंटकांनी अल्पवयीन मुलांना प्रोत्साहन देऊन दगडफेक केल्याचे निदर्शनास येते. अटक केलेल्यांमध्ये दोन सराईत गुन्हेगार आहेत. आगामी काळात विना प्रिस्क्रीपशन अल्प्राझोलम (कुत्ता गोळी) विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. अय्याज अहमद मोहंमद सुलतान उर्फ अय्याज हलचल (वय ४४) व त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध या प्रकरणी पोलिस शिपाई नितेश खैरनार यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
यात देखील राजकारण सुरु झाले आहे. `एमआयएम`चे मालेगावचे आमदार मौलाना यांनी बंदची हाक दिली त्या संघटनांचे प्रतिनिधी निवेदन देऊन घरी निघून गेले होते. टवाळखोरांनी दंगल केल्याचा दावा केला. ते म्हणाले, शहरात झालेल्या हिंसाचार व घटना दुर्दैवी आहेत. बंदची हाक देणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी निवेदन देऊन घरी परतले होते. काही टवाळखोरांनी हिंसक प्रकार केला. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी. मात्र, निरपराधांची धरपकड करु नये. शहरात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. पोलिसांची संख्या वाढवावी.
याबाबत माजी आमदार आसिफ शेख यांनी शहरातील हिंसक घटनांची सर्वंकष चौकशी करावी, अशी मागणी केली. ते म्हणाले, दिवसभर शांततापूर्ण बंद असताना दोन धर्मात अराजकता निर्माण करण्यासाठी काहींनी हा प्रयत्न केला तर नाही ना, याबाबतही चौकशी व्हावी. आगामी महापालिका व काही राज्यातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील वातावरण दुषीत करण्याचा हा प्रयत्न तर नव्हता ना, याकडे लक्ष द्यावे. सहारा हॉस्पिटल व शिवाजी पुतळ्यापुढील जुन्या महामार्गावर हिंसाचार करणाऱ्यांमध्ये कोण-कोण होते, त्याची सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून शहानिशा करावी. दोषींवर कारवाई करताना निर्दोष लोकांवर कारवाई झाल्यास विरोध करु.
रझा अकॅडमी व ऑल इंडिया सुन्नी जमेतुल उलेमातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागल्यानंतर झालेल्या घटनेनंतर शहरातील जनजीवन पुर्वपदावर आले. पूर्व - पश्चिम भागातील सर्व व्यवसाय सुरळीत सुरु होते. हिंसाचारप्रकरणी चारशे ते पाचशे जणांच्या जमावाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तीन, तर आयेशानगर पोलिस ठाण्यात दोन असे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सोळा जणांना ताब्यात घेतले असून, दहा जणांना अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे.
शहरातील हिंसाचाराचे वृत्त समजताच कृषिमंत्री दादा भुसे नाशिकहून तातडीने येथे दाखल झाले. शहरातील परिस्थितीची रात्रीच त्यांनी माहिती घेतली. श्री. भुसे, आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, माजी आमदार आसिफ शेख आदींसह शहरातील प्रमुख मान्यवरांची नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद हॉलमध्ये बैठक झाली. या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर - पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अपर अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधिक्षक लता दोंदे यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते. बैठकीत प्रमुख नेत्यांनी दोषींवर कठोर कारवाई करावी, निरपराध तरुणांना यात अडकवू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराचाही सर्वांनी निषेध केला. श्री. भुसे यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देतानाच नागरिकांनी शांततेसाठी सहकार्य करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करताना शहराचा नावलौकिक जपावा, असे सांगितले.
शहरातील हिंसाचारप्रकरणी आयेशानगर व शहर पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंसाचार प्रकरणातील ५६ जणांची ओळख पटली आहे. संशयितांच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीला स्पेशल स्कॉड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांसह सहा पथक करण्यात आले आहेत. सर्व माहिती, चित्रीकरण, फुटेज, सीसीटीव्ही, प्रत्यक्ष साक्षीदार याची खात्री झाल्यानंतरच संशयितांना अटक करण्यात येत आहे. कोणत्याही निरपराधाला अटक करणार नाही. त्याचवेळी दोषींना पोलिस सोडणार नाही, असे विशे, पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर - पाटील यांनी सांगितले.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.