माजलगाव : कारखानदारांनी एकरकमी एफआरपी जाहीर करावी या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील राष्ट्रवादीच्या या दोन मंत्र्यांमुळेच हे आंदोलन चिघळले असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. अजूनही वेळ गेलेली नसून एकरकमी एफआरपी जाहीर करावी अन्यथा यापेक्षाही मोठा भडका उडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
माजलगाव येथील रयत अर्बन सोसायटीला सदिच्छा भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, कारखानदार शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप केल्यानंतरही त्यांना एकरकमी एफआरपी न देता टप्याटप्याने गाळप केलेल्या ऊसाचे पैसे देतात. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी एकरकमी एफआरपी देऊन उसदरासाठी आंदोलन करीत आहेत.
शेतकरी रस्त्यावर उतरलेला असतानाही अद्याप कोणताच निर्णय घेतला जात नाही. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब थोरात या राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांमुळे हे आंदोलन चिघळले आहे. जे कोल्हापूरला जमतं, जे सीमा भागातील कारखान्यांना जमतं ते सांगली, सातारा जिल्ह्यातील कारखानदारांना का जमत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जर त्यांना एकरकमी एफआरपी देणं होत नसेल तर त्यांनी आमचे कारखाने आजारी पडल्याचे जाहीर करावे. अजूनही वेळ गेलेली नसून कायद्याप्रमाणे एकरकमी एफआरपी जाहीर करावी नसता शेतकरी आंदोलनाचा यापेक्षाही जास्त भडका उडेल. शेतकरी आता ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे शेट्टी म्हणाले.
मराठवाड्यातील सर्व बंद कारखाने जर सुरू झाले तर अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होणार नाही. मराठवाड्याव्यतिरिक्त इतर ठिकाणच्या कारखान्यांची गाळप क्षमता वाढल्यामुळे काही ऊस मराठवाड्याच्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील कारखानदारांनी जाणीवपूर्वक बाऊ करून शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती घालू नये.
शेतकऱ्यांनी "एकरकमी एफआरपी" मागू नये म्हणूनच साखर कारखानदार भीती घालत आहेत परंतु "एकरकमी एफआरपी" घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही तसेच मराठवाड्यातले बंद कारखाने चालू करण्याबाबत शासन उदासीन आहे, यात देखील लक्ष वेधून साखर आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.