file photo of Police. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

खबरदार... कायदा हातात घ्याल तर!

वादग्रस्त पोस्टप्रकरणी एरंडोलपाठोपाठ यावलला पोलिसांकडून तीन गुन्हे दाखल.

Sampat Devgire

जळगाव : नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्याने या पोस्टवरून एरंडोलपाठोपाठ आता यावल तालुक्यांतही दोन समुदाय समोरासमोर भिडल्याने याची गंभीर दखल पोलिस (Police) दलाने घेतली आहे. वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणारे, लाइक व शेअर करणाऱ्यांसह आता पोलिस ठाण्यांवर जमाव घेऊन येणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे (Dr. Pravin Munde) यांनी स्पष्ट केले आहे. (Police take cognizance on Nupur Sharma supporters)

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटू लागले आहेत. सोमवारी (ता. १४) यावल येथे सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांच्या पोस्टचे समर्थन करणारे स्टेटस्‌ ठेवल्याने वादाची ठिणगी पडली. त्यानंतर या पोस्ट विरुद्धची पोस्ट समोरच्या गटाने व्हायरल केल्याने त्याही समुदायाच्या भावना दुखावल्याने दोन्ही गट समोरासमोर आले. यामुळे परिस्थिती चिघळून दोन्ही समुदायांतर्फे शेकडोचा जमाव पोलिस ठाण्यात धडकल्याने यावलसह शेजारच्या तालुक्यांमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.

मात्र, दोन्ही गटांतर्फे आपसात प्रकरण मिटविण्याचे सांगत तक्रार कोणीही दिली नाही. सरकार पक्षातर्फे स्वतः पोलिस फिर्यादी होऊन दोन्ही समुदायातील संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले. तसेच पोलिस ठाण्यावर बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी संबंधितांवर स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एरंडोलमध्येही गुन्हा

एरंडोल शहरात ११ जूनला ‘आय सपोर्ट नुपूर शर्मा’चा ट्रेंड चालवणाऱ्यांविषयी गुन्हा दाखल झाला असून, कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातही किरकोळ घटना

शहरातील अजिंठा चौकात, त्याचबरोबर शाहूनगर परिसरात नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी करणारे पत्रके वाटप केल्याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ दखल घेत कारवाई केल्याचेही डॉ. मुंडे यांनी सांगितले.

कायदा मोडणाऱ्यांची खैर नाही

कोणीही व्हॉटसॲप स्टेटस, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफार्मवर कुठल्याही जाती-धर्माबद्दल तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह्य पोस्ट टाकली, तर त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी जमाव जमवून पोलिस ठाण्यात धडकणारे कथित समाजसेवक, पुढारी, पोस्टला लाइक आणि शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी स्पष्ट केले. तुम्हाला आंदोलन करायचे असेल, तर पूर्व परवानगी घेऊनच ते करता येईल, अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT