Shrirampur Politics : श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमधून हकालपट्टी झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आक्रमक टीका करणारे आणि शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या विजयासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सांभाळणारे प्रकाश चित्ते यांनी अखेर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. विशेष म्हणजे, ज्या मंत्री विखे पाटलांवर चित्ते यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि त्यानंतरही अनेकदा जाहीरपणे टीका केली होती, त्यांच्याच उपस्थितीत झालेला हा प्रवेश श्रीरामपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
एका निवडणुकीत परस्परविरोधी भूमिका, त्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेतील राजकीय वाटचाल आणि आता पुन्हा भाजपमध्ये (BJP) पुनरागमन, असा चित्ते यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा या प्रवेशामुळे अधोरेखित झाला आहे. प्रकाश चित्ते हे श्रीरामपूरमधील भाजपचे जुने आणि आक्रमक हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कुटुंबाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी जुनी नाळ आहे. श्रीरामपूरमध्ये भाजपची संघटनात्मक बांधणी करण्यात चित्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान राहिले आहे. सुमारे 35 वर्षे पक्षासाठी काम करूनही विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचे (Mahayuti) उमेदवार लहू कानडे यांच्याऐवजी एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा प्रचार केला. कांबळे यांना सुमारे 52 हजार मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत चित्ते यांनी कांबळे यांच्या प्रचाराची मोठी जबाबदारी सांभाळली होती. भाजपने पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई केली होती.
या कारवाईनंतर चित्ते यांनी मंत्री विखे पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचा श्रीरामपुरात कार्यक्रम आयोजित करून त्यांनी विखे पाटलांना राजकीय आव्हान दिले होते. विखे पाटील यांनी महाजन यांना श्रीरामपुरात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर विविध मुलाखती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विखे पाटलांवर टीकेची झोड उठवत त्यांनी आपली नाराजी लपवून ठेवली नाही.
दरम्यान, भाजपमधून बाहेर पडूनही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपमधील जुन्या सहकाऱ्यांशी संपर्क कायम ठेवला होता. गिरीश महाजन यांचीही भेट घेऊन त्यांनी पक्षांतर्गत अन्यायाची व्यथा मांडली होती. मात्र, भाजपकडून अपेक्षित राजकीय संधी मिळत नसल्याने ऑक्टोबर 2025मध्ये त्यांनी सुमारे दोनशे कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशावेळी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर चित्ते यांनी श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न केले. अखेर एकनाथ शिंदे शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत त्यांनी जोरदार प्रचार केला. मात्र, काँग्रेसचे करण ससाणे यांनी विजय मिळविला. भाजपचे श्रीनिवास बिहाणी दुसऱ्या क्रमांकावर, तर प्रकाश चित्ते यांना आठ हजार 86 मते मिळाली. त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे नगराध्यक्षपदाची संधीही त्यांच्या हातातून गेली.
एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश करताना नगराध्यक्षपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या चित्ते यांना निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. शिवसेनेतही भविष्यातील राजकीय संधी मर्यादित असल्याची परिस्थिती असताना त्यांनी भाजपमधील जुन्या सहकाऱ्यांशी असलेले संबंध कायम ठेवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीगाठी आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याशीही त्यांनी संपर्क ठेवला होता. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत होती.
अखेर आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये पुनर्प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी मंत्री विखे पाटलांवर टीकेची तोफ डागणारे चित्ते आता त्यांच्याच उपस्थितीत पुन्हा भाजपच्या प्रवाहात आले आहेत. या प्रवेशामुळे श्रीरामपूर भाजपमध्ये चित्ते यांची पुढील भूमिका काय राहणार, पक्षातील जुन्या सहकाऱ्यांशी त्यांचे कसे सूर जुळणार आणि विखे पाटील यांच्याशी पूर्वी निर्माण झालेला राजकीय संघर्ष आता संपुष्टात येणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, भाजपमधून बाहेर पडताना निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करणारे चित्ते आता त्याच पक्षात परतले आहेत. त्यामुळे त्यांच्या घरवापसीला केवळ पक्षप्रवेशापुरते मर्यादित न ठेवता श्रीरामपूरच्या आगामी राजकारणातील महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.