PM Modi  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

PM Modi Shirdi Visit : मोदींच्या शिर्डी दौऱ्याच्या बातमीनेच 'लालपरी'ची उडाली घाबरगुंडी !

MSRTC : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी 2500 बसेसची मागणी, पण पूर्वानुभवामुळे 'लालपरी' सावध

Ganesh Thombare

प्रदीप पेंढारे :

Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. प्रशासकीय पातळीवर दौऱ्याची जय्यत तयारी झाली आहे. यानिमित्ताने पंतप्रधानांची शिर्डी येथे दुपारी सभा होणार आहे. प्रशासकीय पातळीवर नियोजन असले, तरी कार्यक्रमस्थळी गर्दी जमविण्याचे नियोजन भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर आहे.

कार्यक्रमस्थळी लोकांना येता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाच्या तब्बल एक हजार बसेस आरक्षित केल्या आहेत. यातून एसटी महामंडळाला सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाकडे तब्बल अडीच हजार बसेसची मागणी केली होती.

परंतु 'शासन आपल्या दारी', कार्यक्रमाच्या वेळी नगर जिल्ह्यातील विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल झाले होते. तशी ओरड झाली होती. यामुळे एसटी महामंडळाने सावध भूमिका घेत नियोजन वेगळ्या पद्धतीने करत एकच हजार बसेसची व्यवस्था केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी सुमारे अडीच हजार बसेसची मागणी एसटी महामंडळाकडे करण्यात आली होती. मागणी जास्त असल्याने नगर विभागाने इतर विभागाकडून बसेस मागवल्या आहेत. यात नगर विभागाकडे साडेसहाशे बस आहेत. यातील तीनशे, उर्वरित सातशे पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागातून बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत.

एसटी महामंडळाला यातून सुमारे अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. या एक हजार बसेसचे जेवढे किलोमीटर होईल, त्यानुसार भाडे आकारले जाणार आहे. प्रतिकिलोमीटर 55 रुपये भाडे आकारले जाणार आहे. या बसेस आरक्षणापोटी एसटी महामंडळाकडे आतापर्यंत 50 लाख रुपयांचा निधी वर्ग झाला आहे. याशिवाय आणखी 50 लाखांचा धनादेश तयार असल्याची माहिती मिळाली.

एसटी महामंडळाने का उचलली सावध पावलं ?

शिर्डीमध्ये ऑगस्टमध्ये झालेल्या 'शासन आपल्या दारी' उपक्रमासाठी नगर विभागातील साडेचारशे आणि इतर विभागातील अडीचशेच्या वर बसेस होत्या. नियोजनपूर्वक बसेस त्यावेळी न लावल्याने नगर जिल्ह्यातील प्रवाशांचे हाल झाले होते. विद्यार्थ्यांना शाळेत, महाविद्यालयात जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावरून राजकीय वादंग झाला होता. या वेळी मात्र एसटी महामंडळाच्या नगर विभागाने सावध नियोजन केले आहे.

प्रवाशांबरोबरच विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली आहे. नगर विभागातून पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी फक्त 300 बसेस देण्यात आल्या असून, कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी अंतराप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम काळात कोणत्याही प्रवाशाची गैरसोय होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेण्यात आल्याचा दावा एसटी महामंडळाच्या नगर विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे.

'शासन आपल्या दारी'चा निधी रखडला

शिर्डीत ऑगस्टमध्ये 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना देण्यात आला होता. या लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी आणि तेथून परत आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस होत्या. या कार्यक्रमासाठी तब्बल 634 बसेस होत्या.

यात नगर विभागातील साडेचारशे बसेस होत्या. उर्वरित इतर विभागाकडून घेण्यात आल्या होत्या. जिल्हा प्रशासनाकडून यापोटी एसटी महामंडळाला 1 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मिळणार होता. तसे 55 रुपये प्रतिकिलोमीटरनुसार बिल झालेले आहे. यातील 40 लाख रुपये एसटी महामंडळाला रक्कम सुरुवातीला मिळालेली आहे.

आज 20 लाखांची रक्कम वर्ग झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. हा शासकीय निधी आहे. त्यामुळे तो मिळेल, शक्यतो दिवापूर्वी मिळेल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या नगर कार्यालायातील अधिकाऱ्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT