Ahmednagar News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. पुढील आठवड्यात अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बैठक बोलवली आहे. अजित पवार गटाकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात केल्याने भाजपची, पर्यायाने विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर सुरूवातीपासून शरद पवार यांचे लक्ष राहिले आहे. राष्ट्रवादीतून अजित पवार बाहेर पडल्यानंतर देखील शरद पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी दावा कायम ठेवला आहे. गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी नगर दक्षिणची आढावा बैठक घेतली. आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार निलेश लंके यांच्या नावावर शरद पवार यांच्या बैठकीत काहींनी चर्चा केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शरद पवार यांनी निलेश लंके यांच्या नावावर चुप्पी साधली असली, तरी जयंत पाटील यांनी दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याचे सुचवले आहे. यानंतर आठच दिवसात उमेदवार निश्चित होईल आणि त्याचे काम करावे लागले, असे जयंत पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले.
शरद पवार यांच्यापाठोपाठ अजित पवार गटात देखील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात चाचपणी सुरू झाली आहे. अजित पवार महायुतीत असून देखील नगर दक्षिणमध्ये सुरू केलेली ही चाचपणी भाजपबरोबर विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे यांची डोकेदुखी वाढवणारी ठरणारी आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर राज्यात लोकसभा आणि विधानसभा ताकदीने लढण्याचे जाहीर सांगितले होते. आता लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडून राज्यात लोकसभा मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. ही चाचपणी घटस्थापनेच्या अगोदरपासून सुरू झाली आहे. तशा सूचना देखील आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या गेल्या होत्या.
याचा आढावा आता अजित पवार दसऱ्यानंतर आणि शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर घेणार आहेत. यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. अजित पवार गटाने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यास महायुतीत असलेले भाजप-अजित पवार गटात, पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
नगर दक्षिण लोकसभेची जागा सध्या भाजपकडे असून, डॉ.सुजय विखे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे अजित पवार गट आढावा बैठकीत नगर दक्षिणबाबत काय निर्णय घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार यांच्याकडून कोण उमेदवार असेल, याची चर्चा देखील रंगली आहे. नगर दक्षिणमध्ये 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे आणि संग्राम जगताप यांच्यात लढत झाली होती. विखे हे भाजपकडून, तर जगताप हे राष्ट्रवादीचे उमदेवार होते.
निवडणुकीत विखे विजयी झाले. परंतु आमदार संग्राम जगताप यांनी देखील या 2019 च्या निवडणुकीच्या निमित्ताने ताकद आजमावलेली आहे. त्यामुळे आमदार जगताप यांचे नाव 2024 साठी पुन्हा अजित पवार गटाकडून येण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी फुटीअगोदर आमदार निलेश लंके यांचे नाव जबरदस्त चर्चेत होते.
शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून निलेश लंके यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले होते. आमदार लंके यांनी देखील खासदार विखेंना आव्हान देण्यास सुरूवात केली होती. कोरोनात केलेल्या कामामुळे लंकेची लोकप्रियता वाढलेली आहे. राष्ट्रवादी फुटीनंतर लंके हे अजित पवार यांच्याबरोबर गेलेत. असे असले, तरी लंके आजही नगर दक्षिणमध्ये संपर्क ठेवून आहेत. त्यामुळे अजित पवारांकडून त्यांचे देखील नाव समोर येवू शकते.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.