Dr Sujay Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Sujay Vikhe Patil: खासदारकीच्या पहिल्याच टर्मला सुजय विखेंचा संसदेत षटकार; आले पहिल्या...

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News: भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी जनहिताचे प्रश्न उपस्थित करीत संसदेत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आशिया खंडात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे नातू तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे पुत्र असलेले सुजय विखे यांनी खासदार म्हणून लोकसभेत केलेल्या उत्कृष्ट कामामुळे त्यांना १७ व्या लोकसभेत गौरवण्यात येत आहे.

अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून जाहीर झालेल्या लोकसभा सचिवालयाच्या आकडेवारीनुसार २५० नवोदित खासदारांमध्ये महाराष्ट्राच्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांची संसदेतील कामगिरी सरस ठरल्याने बिर्ला यांनीही खासदार सुजय विखे यांचे कौतुक केले आहे. १७ व्या लोकसभेतील १० सर्वोत्तम नवोदित सदस्यांमध्ये त्यांची नोंद घेण्यात आली आहे.

१७ व्या लोकसभेमध्ये २७० खासदार हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. त्यापैकी मंत्री न झालेल्या २५० नवोदित सदस्यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांनी जनहिताचे ४१ हजार १०४ प्रश्न संसदेत उपस्थित केल्याचे आकडेवारीत स्पष्ट होते. या सदस्यांपैकी महाराष्ट्राच्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी ४२६ तारांकित प्रश्नोत्तराच्या चर्चेत सहभागी होत आपले लक्ष वेधले आहे.

जाहीर झालेल्या आकडेवारी नुसार तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, चर्चासत्र आणि लोकसभेचे बिल अशा एकूण ५३१ वेळा त्यांच्या सहभागाची नोंद करण्यात आली आहे. लोकसभेच्या पार पडलेल्या ११ सत्रांमध्ये, सात खासगी विधेयकांच्या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध जनहिताच्या मुद्द्यांवर हस्तक्षेप आपली भूमिका ठाम पणे मांडली.

न्युरोसर्जन असलेले खासदार डॉ.सुजय विखे पाटील जनतेशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेणे, ग्रामीण भागातील प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यांची सोडवणूक करणे याला प्राधान्य देत असतात. याच अनुभवाचा आणि शिक्षणासह मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत अस्खलित संवाद साधण्याचा मला संसदेत फार उपयोग झाल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेला भेटून संवाद साधला की त्यांचे प्रश्न समजतात. त्यांना ऐकल्यावर त्यांच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे उचलणे सोपे होते. हीच गोष्ट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली असून त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिल्याची प्रतिक्रिया खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.

ओम बिर्ला यांनी झिरो अवर वाढवला आणि अधिक नवोदित खासदारांना सभागृहात बोलता यावे, यासाठी सभागृहात दुपारी १ ते २.३० पर्यंत जेवणाचा ब्रेक उशीरा केला, यांचाही आपल्याला फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. या कामगिरीबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले.

पंतप्रधानांकडून कौतुकाची थाप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत विविध चर्चेदरम्यान आम्ही घेतलेल्या सहभागा बद्दल कौतुक केले. आम्ही मांडलेले मुद्दे आणि हरकती या देखील त्यांनी पटलावर घेऊन त्यानुसार सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. हे आमच्या सारख्या पहिल्या टर्मच्या खासदारांसाठी नक्कीच कौतुकाची थाप मिळाल्या सारखं आहे,अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT