Prithviraj Chavan-Prakash Ambedkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prithviraj Chavan : काँग्रेसमधील नाराजांच्या मनधरणीसाठी पृथ्वीराज चव्हाण येणार धुळ्यात!

Dhule Loksabha Constituency 2024 : महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्यापुढे अनेकांची नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे; सध्या जिल्हाध्यक्ष प्रचारापासून अलिप्त आहेत.

Sampat Devgire

Dhule Loksabha and Congress News : धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. डॉक्टर बच्छाव अद्याप धुळे जिल्ह्यात प्रचार सुरू करू शकलेल्या नाहीत. उद्यापासून काँग्रेसचा प्रचार सुरू होण्याची तयारी आहे.

धुळे मतदारसंघात नाशिक आणि धुळ्याचे असे दोन्ही जिल्हाध्यक्ष उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र पक्षाने भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यापुढे प्रबळ उमेदवार देण्यासाठी नियोजन केले. मत विभागणीचा आणि भौगोलिक रचनेचा विचार करून माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली.

त्यामुळे नाराज झालेले धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर आणि नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांनी पदाचा राजीनामा दिला. हे दोन्हीही नेते अद्याप काँग्रेस पक्षातच आहेत. मात्र, त्यांनी उमेदवाराला आपला विरोध कायम ठेवला आहे आणि ते प्रचारापासून अलिप्त आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मालेगावसह काही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार बच्छाव यांना कार्यकर्त्यांचा विरोध झाला होता. या पार्श्वभूमीवर बच्छाव यांनी विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद गटनिहाय प्रचार दौरा केला. उद्यापासून काँग्रेसने धुळे जिल्ह्यात प्रचार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्छाव पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत एकत्र येणार आहेत.

इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची प्रचाराच्या नियोजनासाठी बैठक होणार आहे. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, समाजवादी पक्ष यांसह विविध सहकारी पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहतील. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व दिले जात आहे.

धुळे शहरातील या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आमदार कुणाल पाटील धुळे मतदारसंघाच्या प्रचाराचे नियोजन करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष शरद पाटील यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला आह. नाशिकचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्यासह विविध पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील.

या बैठकीत सहकारी पक्षांपेक्षा काँग्रेस पक्षातील नाराजांना प्रचारात सामावून घेणे हे मोठे आव्हान आहे. स्थानिक नेत्यांना याबाबत साकडे घालण्यात आले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या धुळे मतदारसंघाच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

धुळे मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉक्टर भामरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याबाबतदेखील अन्य इच्छुक आणि पक्षाचे काही पदाधिकारी नाराज आहेत अशीच अवस्था काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर बच्छाव यांच्याबाबत आहे, त्यामुळे या मतदारसंघात अद्याप प्रचारात रंग भरलेला नाही. दोन्ही उमेदवारांना पक्षातील महाराजांची समजूत घालण्याचे मोठे आव्हान आहे. यामध्ये जो यशस्वी होईल, त्याला निवडणूक सोपी ठरण्याची चिन्हे आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT