Anna Hazare on Ajit Pawar death Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anna Hazare on Ajit Pawar death : अजितदादांशिवाय राजकारण पोरकं! हजारे, शिंदे, विखे अन् जगतापांच्या भावनिक सहवेदना

Reactions Pour In After Ajit Pawar Demise Anna Hazare, Vikhe Patil, Ram Shinde : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर अण्णा हजारे, प्रा. राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील आणि संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत, दुःख व्यक्त केलं.

Pradeep Pendhare

Deputy CM Ajit Pawar death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने पुणे, बारामतीपाठोपाठ त्यांचा आजोळ अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. अहिल्यानगरमधील दिग्गज नेत्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अजित पवार यांचं असं जाणं म्हणजे, लोकांचा हानी आहे.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी,खोल वेदना देणारी घटना असल्याचे म्हटले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मैत्री जपणारा नेता गमवल्याची भावना व्यक्त केली. आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरचा पाठीराखा हरपल्याचं म्हटलं आहे. अहिल्यानगरमधील या सर्व नेत्यांनी बारामतीकडे धाव घेतली असून, अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या गुरूवारी होणाऱ्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले की, "उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निधन झाले आहे, ही घटना शब्दात सांगता येणार नाही, अशी अतिशय दुर्दैवी घटना आहे. अचानकपणे ही दुर्दैवी बातमी सकाळी येऊन धडकली. दुर्दैवाने या देशाची जनसंख्या ही समुद्राला आलेल्या भरतीप्रमाणे वाढत चालली आहे, त्यातील अजित पवार सारखी माणसं, अशी जाणं ही देशाची आणि समाजाची फार मोठी हानी आहे."

अजितदादांच्या कामाची पद्धत आणि स्पष्टवक्तेपणा सांगताना, "अजितदादा यांच्याशी असा थेट राजकीय काही संबंध नव्हता. परंतु कामानिमित्ताने त्यांच्याशी संपर्क आला होता. ते राळेगणला सुद्धा येऊन गेले होते. त्यावेळी ते भेटून गेले होते. समाज हितासाठी आणि देश हितासाठी जे जे शक्य आहे, ते करायला हवे, अशा मताचे अजितदादा होते, हे त्यावेळी त्या भेटीत लक्षात आले," अशा आठवणी अण्णांनी जागवल्या.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी, "वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा, प्रशासकीय नैपुण्य, संवेदनशील नेतृत्व आणि या सर्वांचा आधार असलेले धडाडीचे विकासोन्मुख राजकारण, हे अजितदादा पवारांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते. अजितदादा पवार यांच्या विलक्षण कार्यकर्तृत्वाचे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशी सहवेदना व्यक्त केली.

अनपेक्षित खोल वेदना देणारी घटना

प्रा. राम शिंदे आदरांजली वाहताना म्हणाले, "दिलेला वेळ आणि शब्द पाळणारे, अशी ख्याती असलेले राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार अचानक वेळेआधी आपल्याला सोडून गेले. आज दिवस या अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटनेने उजाडला. ज्यामुळे आपण सर्वच शोकमग्न झालो आहोत. अजितदादा आपल्यात नाहीत हे स्वीकारायला मन अजूनही तयार नाही, इतकी ही घटना अनपेक्षित आणि खोल वेदनादायी आहे." पवार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. माझी अजितदादा यांना आणि या दुर्दैवी विमान अपघात घटनेत प्राण गमवावे लागलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली, ओम् शांती, अशी सहवेदना प्रा. शिंदे यांनी व्यक्त केली.

राजकारणापलीकडील मित्र गमावला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची घटना अत्यंत वेदनादायी असून, राजकारणापलीकडे जावून विचार करणारा एक मित्र आपण गमावल्याची भावना जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. मंत्री विखे पाटील यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत जागवलेल्या अनेक आठवणींना उजाळा देताना, गेली अनेक वर्षे विधीमंडळात आणि राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांच्या समवेत काम कारण्याची संधी मिळाली. राज्याच्या विकासात्मक बाबतीत अनेकवेळा एकत्रित बसून आम्ही निर्णय केले. जे होईल त्यालाच पुढे घेवून जाण्याचा त्यांचा एक स्वभाव होता. स्पष्टवक्तेपणा असला तरी, मनाने अतिशय प्रेमळ आणि विकासात्मक दृष्टीकोन ठेवून सर्वाना बरोबर घेवून जाण्याची हातोटी त्यांची होती, अशा आठवणींना उजाळा दिला.

कधीही भरून न येणारी हानी

अहिल्यानगरच्या विकासात्मक प्रक्रियेत त्यांचे नेहमीच सहकार्य मिळाले. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत लोणी बुद्रुक गावात पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि खासदार बाळासाहेब विखे पाटील साहेबांच्या पुतळा अनावरण समारंभास त्यांची उपस्थिती ही आमच्या परिवारासाठी सदैव आठवणीत राहणारा क्षण होता. राजकारणातील एक अनुभव संपन्न नेत्तृत्व अजितदादांच्या रुपाने राज्याने गमावले असून, कधीही भरून न येणारी हानी या दुर्दैवी घटनेने राजकीय व सामाजिक क्षेत्राची झाली आहे. एक मित्र गेल्याचे दु:ख मोठे असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

अहिल्यानगरचा पाठीराखा हरपला

आमदार संग्राम जगताप यांनी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीवर विश्वासच बसत नाही. ही अत्यंत दु:खदायी व धक्कादायक घटना आहे. त्यांच्या निधनाने अहिल्यानगरचा पाठीराखा हरपला आहे, अशी भावना व्यक्त केली. धाडसी आणि प्रशासनाला योग्य दिशा देणारा लोकनेता आज आपल्यातून गेला आहे. राज्याच्या विकासासाठी त्यांनी जे योगदान दिले, ते अत्यंत मौलिक व महत्त्वपूर्ण होते. प्रचंड निर्णय क्षमता आणि निर्भीड असलेल्या अजितदादांनी महाराष्ट्राला दिशा देताना राजकारणापलीकडे जात सर्वसामन्य नागरिक, शेतकर्‍यांसाठी मोठी कामे केल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. अरुणकाकांच्या निधनानंतरही त्यांनी मला व परिवाराला दु:खातून सावरण्यासाठी मोठा धीर देत आधार दिला होता. त्यांच्या निधनाने आमचा आधारवड कोसळला आहे, असेही सहवेदना आमदार जगताप यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT