Pune Nashik Semi High Speed Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची समिती स्थापन करणे म्हणजे, पुन्हा शून्यातून सुरू करणे, असा घणाघात काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर थोरातांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. जयश्री थोरात यांच्यासह संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने आंदोलनात हजेरी लावली.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी आज पाच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नाशिक येथे आंदोलनात आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे आंदोलनात काहीसा तणाव निर्माण झाला. संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनाचे नेतृत्व करताना, सरळ मार्गात खोडा घालून शास्त्रज्ञ डॉ. काकोडकर समिती स्थापन करणे म्हणजे, शून्यात सुरू करणे, असा घणाघात केला.
सत्यजीत तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यावर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) चांगलेच संतापले. अटकेला घाबरणारे आम्ही नाही. आमचा वारसा स्वातंत्र्यसैनिकाचा आहे, असे एका वाक्यात सूचक इशारा थोरातांनी दिला. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत केंद्रातील रेल्वे मंत्रालयाच्या भूमिकेवर टिप्पणी करताना, थोरातांनी केंद्र सरकारपेक्षा लहान मुलांना चांगले समजते, असा बोचरा प्रहार केला.
आमच्या काळात केंद्र सरकारच्या सर्व मान्यता मिळाल्या होत्या. आता धर्माचं नाव घेऊन चुकीची काम केले जात आहे. 1 जानेवारी 2027ला ही रेल्वे धावेल, असं नियोजन अजितदादांनी आणि आम्ही केले होते. आता GMRTचे कारण देताय, तेंव्हा GMRT दिसत नव्हतं का? असा सवाल बाळासाहेब थोरातांनी केला.
जिथे रेल्वेचे काम थांबले, तिथून पुन्हा सुरू झाली पाहिजे. चुकीचे काम करणाऱ्यांना साईबाबा आशीर्वाद देत नाहीत. चुकीचे काम नका रे करू, असे म्हणताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता थोरातांनी सुनावले.
शास्त्रज्ञ डाॅ. काकोडकर समितीला आमचा विरोध नाही. सर्व काही मान्यता असताना, पुन्हा शून्यातून सुरूवात करायला आमचा विरोध आहे. समिती आली म्हणजे खोडा. नाशिक, पुणे, शिर्डीला आधीच रेल्वे आहे. मग आमच्या विकासात का खोडा घालता? असा प्रश्न करत पुणे नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच झाली पाहिजे, यासाठी लढा सुरूच राहिल, असा इशारा थोरातांनी राज्य व केंद्र सरकारला दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.