

Udupi Congress leader David Dsouza murder : कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात काँग्रेस नेते, मुदरंगडी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष आणि कंत्राटदार डेव्हिड डिसोझा यांच्या भरदिवसा झालेल्या हत्या प्रकरणात पोलिसांनी उत्तर प्रदेशातील कथित शूटर राजू याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अटकेनंतर पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करताना झालेल्या झटापटीत राजूच्या उजव्या पायावर पोलिसांनी गोळी झाडली. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
उडुपी जिल्ह्यातील कापू तालुक्यातील मुदरंगडी पेठेतील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चसमोर शुक्रवारी डेव्हिड डिसोझा यांच्यावर गोळीबार करण्यात आला. पिलारू गावातील या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी डिसोझा यांच्यावर गोळ्या झाडल्याचे पोलिस (Police) तपासात समोर आले आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या डिसोझा यांना स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले असून श्वानपथक आणि गुन्हे तपास पथकाच्या मदतीने तपास करण्यात आला. हत्येचा गुन्हा (Crime) दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांनी उत्तर प्रदेशातील राजू याला ताब्यात घेतले. तो या हत्येतील कथित शूटर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
राजूला कापू पोलिस ठाण्याचे निरीक्षक तेजस्वी आणि कारकळ ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रसन्न यांच्या पथकाकडून पुढील कारवाईसाठी नेण्यात येत होते. बैंदूरजवळील ओत्तिनेणे येथे राजूने लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, यावेळी राजूने पोलिसांवर हल्ला केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना पोलिस निरीक्षक तेजस्वी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने तेजस्वी यांनी सर्व्हिस पिस्तुलातून राजूच्या पायावर गोळी झाडली. त्यानंतर राजूला पुन्हा ताब्यात घेण्यात आले.
या झटापटीत पोलिस निरीक्षक तेजस्वी जखमी झाले असून त्यांच्यावर उडुपी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उडुपी जिल्हा पोलिस अधीक्षक हरिराम शंकर यांनी रुग्णालयात जाऊन तेजस्वी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डेव्हिड डिसोझा यांच्या हत्येमागील नेमके कारण काय, या हत्येत आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि हल्लेखोरांना कोणी सुपारी दिली होती का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठीही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.